नवी मुंबई येथे अलीकडेच झालेल्या शालेय राज्य लॉन टेनिस निवड चाचणी स्पर्धेतून येथील सिद्धार्थ साबळे, विक्रांत मेहता, अभिषेक शुक्ल यांची १४ वर्षांआतील महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे. याशिवाय १७ वर्षांआतील वयोगटात केंद्रीय विद्यालय संघटनेतर्फे आदित्य कुमारची निवड झाली. हे सर्व खेळाडू बालेवाडी येथे दोन ते पाच जानेवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलमध्ये होणाऱ्या ५९ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राकडून सहभागी होणार आहेत. हे सर्व खेळाडू राष्ट्रीय लॉन टेनिस प्रशिक्षक राकेश पाटील यांच्याकडे नाशिक जिमखान्यात नियमित सराव करतात. एकाच केंद्रातील इतक्या संख्येने लॉन टेनिससारख्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड होण्याची ही उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.
अजिंक्य वैद्यला ज्युदोमध्ये सुवर्ण
मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात नाशिक येथील अजिंक्य वैद्यने सुवर्णपदक मिळविले. या कामगिरीमुळे जानेवारीत दिल् ली येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. पृथ्वीराज रहाणे, रितेश टिळे व मुलींमध्ये करुणा थट्टेकर यांनी आपापल्या गटात कांस्यपदक प्राप्त केले. याशिवाय अजिंक्य घुगे, प्रतीक घुगे, प्रणाली देशमुख यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. वाघेरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील पाच मुलींनी प्रथमच राज्य पातळी स्पर्धेपर्यंत धडक मारत दोन कांस्यपदके मिळवली. त्यांची नावे सोनाली गोराळे व पुष्पा मोंढे अशी आहेत. त्यांना नामदेव कचरे यांनी प्रशिक्षण दिले. साई प्रशिक्षक विजय पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
उत्तरा खानापुरेचे यश
हरियाणामध्ये झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोप मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या उत्तरा खानापुरेने पुणे विद्यापीठाचे नेतृत्व करीत उत्तर महाराष्ट्राला वैयक्तिक स्वरूपात प्रथमच रौप्यपदक मिळवून दिले. केटीएचएम महाविद्यालयातील तृतीय वर्षांत शिकणारी उत्तरा ही यशवंत व्यायामशाळेत इयत्ता सातवीपासून सराव करीत आहे. प्रशिक्षक यशवंत जाधव यांचे मार्गदर्शन तिला लाभले आहे. सारडा कन्या विद्यामंदिरच्या क्रीडा शिक्षिका ओढेकर, सप्रे, खरे यांचे प्रोत्साहन तिला नेहमीच लाभले. व्यायामशाळेत सराव करणाऱ्या खेळाडूंनी भविष्यातही अशीच प्रगती करावी, अशी अपेक्षा प्रशिक्षक जाधव, व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, माजी मल्लखांबपटू आबा घाडगे यांनी सांगितले.