जाहीर केलेली सवलत बंद करत महावितरण कंपनीने वीज दरात केलेल्या भरमसाठ वाढीमुळे यंत्रमाग व्यवसायाचे कंबरडे मोडण्याची वेळ आल्याची तक्रार करत यासंबंधी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये येथील यंत्रमाग कारखानदारांनी सहभाग नोंदवत बंद पाळला. या निमित्ताने यंत्रमागधारकांनी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलनही केले.
शासनाने २०१४ मध्ये यंत्रमागधारकांसाठी वीज आकारणीत वीस टक्के सवलत लागू केली होती. मात्र आता ही सवलत बंद करतांनाच वीस टक्के दरवाढ करण्यात आली. इतकेच नव्हे तर महावितरणने आणखी पंधरा टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव नियामक मंडळाला सादर केला आहे. अशा रितीने यंत्रमागधारकांना वीजेपोटी तब्बल ५५ टक्के भरुदड सोसावा लागणार असल्याने हा व्यवसाय मोडकळीस येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यांच्या तुलनेत राज्यात अडीच पटीने दरवाढ होत असल्याने यंत्रमागावर तयार होणाऱ्या कापडाचा उत्पादन खर्च लक्षणीयरित्या वाढणार आहे. स्पर्धेत राज्यातील यंत्रमाग व्यवसायाची पीछेहाट होईल. तसेच मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणारा हा व्यवसाय अन्य राज्यात स्थलांतरित होईल अशी भीती देखील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. ही दरवाढ रद्द करून पूर्ववत सवलत लागू करण्याच्या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला. शासन दरबारी गाऱ्हाणे मांडण्यासाठी यंत्रमाग व्यावसायिकांच्या संघटनांतर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येऊन आपल्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.