‘तुम रोज दुल्हन के कॉस्च्युम में स्कुटर पे बैठकर मेरेपास आती हो..’ स्कूटरवर बसून येणाऱ्या त्या तरूणीकडे बघून एक आशाळभूत चेहऱ्याच्या मनातल्या मनात संवाद सुरू असतात. ती स्कूटर हळूहळू जवळ येऊ लागते आणि आता स्कूटरवरच्या त्या दुल्हनसाठी पुढचे वाक्य उच्चारणार तोच दुल्हनच्या वेशात येणारी त्याची ख्वाबोंकी ‘मल्लिका’ स्कूटरवरून पडते. हा कुठलाही पुस्तकातला प्रसंग नाही तर मल्लिका शेरावतच्या स्वयंवराचा शो सुरू असताना घडलेला हा प्रसंग आहे.
‘लाईफ ओके’ वाहिनीवर ‘द बॅचलोरेट इंडिया : मेरे खयालों की मलिका’ नावाचा शो सुरू होतो आहे. यात मल्लिकाला वधू म्हणून निवडण्यासाठी ३० वर परीक्षा देणार आहेत. तर याच शोच्या प्रोमोजचे चित्रिकरण सुरू होते. प्रोमोसाठी ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील करीनाचा स्कूटरवरून येणारा प्रसंग आहे तसेच दृश्य निवडण्यात आले होते. आणि छानशी साडी नेसून स्कूटरवर बसून मल्लिकाची एंट्री होणार होती. पण, मल्लिकाची स्कूटर घसरली. भरीस भर म्हणून तिची साडीही स्कूटरच्या चाकात अडकली. तिची साडी फाटली, तिला किरकोळ लागलं म्हणून दुल्हन थोडक्यात बचावली. पण, शांत बसेल ती मल्लिका कुठली?
क्षणार्धात, मल्लिका उठली. तिने साडी नीट केली आणि पुन्हा चित्रिकरणासाठी उभीही राहिली. अखेर, शादी का सवाल है.. सध्या चित्रपटातून कामे नाहीत निदान टीव्हीवाल्यांमुळे का होईना लग्नाची गाठ बांधली जाते आहे. मग अशी सुवर्णसंधी हातून गेलेली कशी चालेल? त्यामुळे आम्ही ख्वाबोंकी म्हणत असलो तरी वाहिनीने तिला खयालों की मलिका म्हटले आहे तर सध्या या मल्लिकाचे त्याच स्कूटरवरचे प्रोमो झळकू लागले आहेत. आता या मल्लिकाला निवडणारा तो धाडसी वीर कोण?, याचीच उत्सूकता आहे.