राज्यात लवकरच राष्ट्रवादीचा वीज घोटाळा उघडकीस येणार असून, यात कोळसा निर्यातीत राष्ट्रवादीचे हात काळे झाल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचे स्पष्टीकरण महानिर्मिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी केला आहे.
खासदार राजू शेट्टी यांनी सोलापुरात गेल्या गुरुवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल करताना, राज्यात कोळसा उपलब्ध असताना राष्ट्रवादीच्या हितसंबंधातून इंडोनेशियातून चढय़ा दराने कोळसा आयात केला गेल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना महानिर्मितीने म्हटले, की देशी कोळसा पुरवठा मात्रेतील आणि दर्जातील (उष्मांकातील) कमतरता भरून काढण्यासाठी महानिर्मिती कंपनीने केंद्रीय कोळसा मंत्रालय, केंद्रीय विद्युत प्राधिकरण व केंद्रीय विद्युत मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागारांनी ठरवून दिलेल्या मात्रेनुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक पारदर्शक निविदांद्वारे कोळसा आयात करते. केंद्र सरकारच्या कोळसा आयात धोरणानुसार देशी कोळशाच्या टंचाईच्या पाश्र्वभूमीवर वीजनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केवळ महाजनकोच नव्हेतर देशातील एनटीपीसी व इतर सर्व राज्य विद्युत मंडळ तथा कंपन्यांना कोळसा आयातीचे निर्देश दिले जातात. मे. कोल इंडियातर्फेदेखील कोळसा आयातीचे धोरण राबवले जाते. महाजनकोतर्फे मात्र एकूण आवश्यक असलेल्या कोळशाच्या मात्रेपैकी जेमतेम ७ ते ८ टक्के एवढाच कोळसा आयात केला जातो. प्रत्यक्षात केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने महाजनकोसाठी निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षाही कमी प्रमाणात महाजनकोने आयात कोळशाचा वापर केला आहे. महानिर्मितीने आतापर्यंत खरेदी केलेल्या कोळशाचा दर हा आंतरराष्ट्रीय निर्देशांकापेक्षा कमी असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे.