scorecardresearch

‘सोबत संगत’ नात्यांतले तरल अनुबंध

माणसाच्या आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर कळत-नकळत अनेक नाती निर्माण होत असतात. रक्ताची तसंच विवाहानं निर्माण होणारी नाती या सीमित परीघातून माणसं आता बाहेर पडत आहेत.

माणसाच्या आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर कळत-नकळत अनेक नाती निर्माण होत असतात. रक्ताची तसंच विवाहानं निर्माण होणारी नाती या सीमित परीघातून माणसं आता बाहेर पडत आहेत. आपलं जगणं जसजसं व्यापक अन् व्यामिश्र होत आहे तसतशी अनेक अनाम नाती आपल्याही नकळत निर्माण होताना दिसतात. जगण्याच्या धबडग्यात या नात्यांचे सूक्ष्म पदर कदाचित आपल्याला नीट जाणवतही नाहीत; पण ते असतात. अदृश्य रूपात. एखाद्या निकराच्या क्षणी अवचितरीत्या ते सामोरे येतात आणि आपण दिग्मूढ होऊन जातो. तो क्षण साक्षात्काराचा असतो. माणूस म्हणून उन्नत, उदात्त होण्याचा असतो. त्या क्षणी जाणीव-नेणिवेच्या पातळीवर खूप काही सापडलेलं असतं आपल्याला.
अर्थात हे होण्यासाठी नेहमी काहीतरी घडावंच लागतं असंही नाही. मेघांच्या भारानं काळवंडलेला आसमंत विजेच्या अकस्मात कल्लोळानं उजळून निघावा तसं साधंसं काहीतरी घडतं आपल्या आयुष्यात.. आणि लख्खकन् साक्ष पटते- या तरल नात्याची. त्यातल्या नाजूक भावबंधांची. माणूस म्हणून संपन्न अन् समृद्ध करणारा अनुभव असतो तो.
नात्याचा हा सुंदर गोफ माणसा-माणसांतलाच असतो असंही नाही. तो निसर्गाशी असू शकतो. प्राणिमात्रांशी असू शकतो. शब्द-सुरांशी असू शकतो. अगदी स्वत:शीही असू शकतो. ‘आपुलाच संवाद आपणाशी’ असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अंतर्मनाशी असलेलं नातंच आपण धुंडाळत असतो, नाही का?
अशा नात्यांचा गुंतवळा समजून घेताना अस्पर्श, अनाघ्रात, अलवार असं काहीतरी हाती लागतं आपल्या. संपदा जोगळेकर-कुळकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘सोबत संगत’ हा नाटय़ाविष्कार पाहताना हेच सतत जाणवत राहतं. ‘रेव्ह्य़ू’ हा नाटय़प्रकार मराठी रसिकांना खचितच अपरिचित नाही. परंतु सातत्यानं या प्रकारातली नाटकं येत नसल्यानं त्याचं थोडंसं आपल्याला विस्मरण झालेलं आहे. ‘सोबत संगत’ हे या प्रकारातलं नाटक आहे. किंवा असू म्हणू हवं तर, की ‘डेली सोप’च्या या जमान्यात प्रेक्षकांच्या एकाग्रतेची मर्यादा कमी होत चालल्यानं एकाच विषयावरील दोन अंकी नाटकात त्यांना गुंतवून ठेवण्यावर मर्यादा येत असल्यानं त्यावर काढलेला हा कलात्मक तोडगा आहे. किंवा ‘दस कहानियां’ वा ‘बॉम्बे टॉकिज’सारख्या चित्रपटांच्या प्रभावातून वैविध्यपूर्ण कथा-कोलाजाद्वारे त्यांना गुंतवण्याचा हा प्रयत्न आहे. हेतू काही असो- हा रंगाविष्कार प्रेक्षकांना खिळवून ठेवतो यात शंका नाही. ‘नाटक’ पाहायला आलेले प्रेक्षक नातेसंबंधांवरील चार कथांच्या या कोलाजाने कदाचित गोंधळूनही जातील; परंतु ‘सोबत संगत’ पाहिल्यावर त्यांची निराशा मात्र होत नाही, हे नक्की.
यातल्या चारही कथा चार परीच्या आहेत. त्यांचा एकमेकांशी तसा काही संबंध नाही. तरीही त्या एका सूत्रात गुंफल्या आहेत हे बारकाईनं विचार करता जाणवतं. पैकी पहिली कथा आहे आजच्या तरुणाईची. लग्नासाठी पत्रिका वगैरे जुळण्याच्या गरजेवर संपूर्ण अविश्वास असलेले ‘एफबी’च्या जमान्यातले आजचे उच्चशिक्षित तरुण-तरुणी आता लग्नही सोशल नेटवर्किंग साइटवर जुळवू लागले आहेत. सोनल आणि मिलिंद अभ्यंकर यांचं लगही्न अशाच तऱ्हेनं जुळवण्याचा घाट सोनलच्या आई-वडलांनी घातलाय. त्यांच्या आग्रहाखातर दोघांची पत्रिका जुळते का, हेही पाहिलं गेलंय. ती जुळते म्हटल्यावर दोघांनी एकमेकांना भेटायचं ठरतं. तत्पूर्वी फेसबुकवर त्यांनी आपले अपडेट्स टाकलेले असतातच. परस्परांना आपली, आपल्या अपेक्षांची किमान माहिती असावी, हा त्यामागचा हेतू. ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी त्यांची भेट होते तेव्हा सोनलची जिवाभावाची मैत्रीण लिझीही (कुत्री) तिच्यासोबत असते. या भेटीत आपल्या आवडीनिवडी आणि अपेक्षा भिन्न आहेत, हे दोघांच्याही लक्षात येतं. तरीही त्या दोघांना परस्परांत असं काहीतरी आढळतं, ज्याने ते एकमेकांचे जोडीदार होऊ शकले नाहीत, तरी परस्परांचे चांगले मित्र बनतात. त्यांच्यातला एक दुवा लिझीही असते. या प्रवेशात हाडामांसाची दोन माणसं आणि एक मुका जीव यांच्यातले ताणतणाव आणि समजूतदारपणा नाजूकपणे उलगडत जातो. त्यातून एक परिपक्व नातं जन्माला येतं.
दुसरी कथा आहे- गाणं हेच ज्यांचा श्वास आहे अशा एका खेडेगावातल्या दोघा जीवश्चकंठश्च मैत्रिणींची. गुलाब आणि भिंगरीची. त्यांना एका चॅनलवर आसभास नसताना गाण्याची संधी मिळते काय; आणि अख्खं गाव असूयेनं त्यांच्या विरोधात जातं. आता काय बुवा या मोठ्ठय़ा झाल्या! यांना आता आपल्या गावंढय़ा कार्यक्रमात घ्या कशाला? म्हणत त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो. गुलाबचा प्रियकर शिऱ्याही गावाला सामील होतो. गाण्याविना जगू न शकणाऱ्या त्या दोघी एकाकी पडतात. या आघातानं खचलेली गुलाब आत्मनाशाचा आधार घेऊ बघते. पण भिंगरी खंबीर असते. ती गुलाबला आत्मघातापासून परावृत्त करते आणि गावाचं आव्हान स्वीकारून दोघीही आपलं गाणं निर्धारानं पुढं नेण्याचा निश्चय करतात.  
तिसरी कथा आहे एकुलत्या मुलीनं बंड करून लग्न केल्यानं तिला दुरावलेल्या घायाळ आई-वडिलांची! मुलीविना जगताना त्यांनी वास्तवाशी जुळवून घेतल्याचा कितीही आव आणला तरीही घाव वर्मी बसलेला असतो. अर्थात पोटच्या पोरीबद्दलची माया आतडय़ांत असतेच. व्यक्त करून दाखवली नाही, तरी! फॅण्टसीतून ही कथा उलगडत जाते. तिच्यात कुठंही उरबडवेपणा दिसत नाही की त्रागाही. आहे ते प्राप्त वास्तव नाकारणं. तेही थेटपणे नव्हे. धक्कातंत्रातून त्यांच्यातलं हे दुखावलेलं नातं अवचित समोर येतं.   
चौथं नातं मानवी नाहीए. ते आहे शब्द-सुरांच्या एकातानतेचं! या नात्याकडे निर्देश करण्याच्या निमित्तानं मराठी भावसंगीताचा समृद्ध खजिना आणि त्याचे प्रतिभावंत जन्मदाते यांच्यातलं परस्परनातं अधोरेखित होतं. त्याचबरोबर रसिक व कलावंत यांच्यातलंही!
लेखक-दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी हा एपिसोडिक नाटय़ाविष्कार विलक्षण ताकदीनं आविष्कृत केला आहे. लेखनात बुद्धय़ाच सोडलेल्या अनेक सूक्ष्म, मोकळ्या जागा त्यांनी प्रयोगात नजाकतीनं भरून काढल्या आहेत. मुळात त्यांच्या लिखाणातही जी परिपक्वता दिसते ती त्यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारी आहे. कलावंतांच्या प्रतिभेचा कस पणाला लावणारा हा ‘प्रयोग’ आहे. आणि त्यात स्वत: संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांच्यासह अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे कलावंतही कसोटीस उतरले आहेत. या कथात्म प्रसंगांचा पोत इतका भिन्न भिन्न, विस्तृत आणि सूक्ष्म आहे, की हे शिवधनुष्य उचलणं हे कुठल्याही कलाकारासाठी आव्हानच आहे. हरएक कथेनुरूप शहरी वा ग्रामीण बोली, पेहेराव, व्यक्तिमत्त्व, मानसिकता, अभिव्यक्ती या सगळ्यांत बदल करणं.. तोही काही क्षणांत- हे भयंकर अवघड आहे. एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत, एका व्यक्तिमत्त्वातून दुसऱ्या व्यक्तिमत्त्वात शिरण्याकरता क्षणभराचीही उसंत नसताना हे साधणं- साध्य करणं, हे येरागबाळ्याचं काम नाही. त्याकरता तिघांनाही हॅट्स ऑफ!
दिग्दर्शिका संपदा जोगळेकर यांनी या कथात्म प्रवेशांमध्ये केलेली सूक्ष्म कलाकुसर, त्यातलं अलवारपण आणि सूर-लय-तालाचं दाखवलेलं भान अचंबित करणारं आहे. त्याचवेळी त्यांनी एक कलाकार म्हणून पहिल्या कथेत लिझी(कुत्री)चं ‘मानवीपण’ आणि प्राणीतत्त्व यांच्यात जो तोल साधला आहे, तो तर लाजवाबच! दुसऱ्या कथेतली त्यांची शहरी चमकधमक सहज पेलल्याचं दर्शविणारी, परंतु आतून भांबावलेली, धास्तावलेली अनागर गुलाबही लक्षवेधी झालीय. मुलीच्या दुरावण्याचं दु:ख हसऱ्या मुखवटय़ाआड दडपून टाकणारी वृद्धा तिच्या साऱ्या जाणिवांसह संपदा जोगळेकर यांनी साकारली आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी सोनलचं ‘मॉड’ व्यक्तित्व, तरुणाईची भाषा, त्यांची व्यक्त होण्याची तऱ्हा- इतकी अस्सल वठवलीय, की प्रत्यक्षातल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थांग लागू नये. हे स्थित्यंतर सोपं नाही. याहूनही त्या थक्क करतात ते भिंगरीच्या रूपात. मुदलात त्यांचं दिसणं शहरी आहे. त्यात खेडवळपणाचा अंशदेखील नाही. असं असता खेडेगावातल्या भिंगरीचं भिरभिरतं अवखळ, अल्लड रूप त्यांनी ज्या सहजतेनं साकारलंय, त्याला तोड नाही. भिंगरी यापेक्षा वेगळी असूच शकत नाही. दोन टोकाच्या या भूमिका त्यांची रेंज दर्शविते.
अविनाश नारकर यांनीही पहिल्या कथेतला आधुनिक आचारविचारांचा मिलिंद आणि तिसऱ्या कथेतले वृद्ध गृहस्थ या दोन्हींतलं वेगळेपण गेश्चर-पोश्चरमधून नेमकेपणी दाखवलं आहे. पहिल्या कथेत कारुण्याच्या झालरीतला खेळकरपणा आणि दुसऱ्यातली त्राग्याच्या आवरणातली दुखावलेपणाची भावना त्यांनी व्यवस्थित पोहोचवली आहे.
शेवटच्या नातेसंबंधातील शब्द-सुरांच्या जुगलबंदीनं नात्याचा एक वेगळाच पैलू आपल्यासमोर येतो. ऐश्वर्या नारकर आणि संपदा जोगळेकर यांनी तो नृत्य-अदेतून छान खुलवला आहे.
राजन भिसे यांनी सूचक नेपथ्यातून प्रयोगाची मागणी यथार्थपणे पुरविली आहे. परीक्षित भातखंडे यांचं संगीत/पाश्र्वसंगीत नादमधुर आहे. प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे यांनीही आपली कामगिरी नेहमीप्रमाणे चोख बजावली आहे. पूर्णिमा ओक यांची वेशभूषा आणि कृष्णा बोरकर- दत्ता भाटकर यांची रंगभूषा पात्रांना त्यांचं व्यक्तिमत्त्व बहाल करते. दुसऱ्या कथमधलं गाणं सुश्राव्य तर आहेच, शिवाय ते पेश करतानाची संपदा जोगळेकर आणि ऐश्वर्या नारकर यांची अदाकारीही दाद देण्याजोगी.   
‘सोबत संगत’च्या रूपात एक आगळावेगळा ‘प्रयोग’ रंगभूमीवर पाहायला मिळतो. रसिकांनीही त्याचं खुल्या दिलाने स्वागत करायला हवं.

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त ( Ravivar-vruttant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi drama review sobat sangat

ताज्या बातम्या