scorecardresearch

आशयघन चित्रपटांना आता चांगले दिवस – मतकरी

निव्वळ श्रीमंतीचा हव्यास असलेला एक वर्ग समाजात तयार होतो आहे, काही प्रमाणात तयार झालाही आहे.

आशयघन चित्रपटांना आता चांगले दिवस – मतकरी

निव्वळ श्रीमंतीचा हव्यास असलेला एक वर्ग समाजात तयार होतो आहे, काही प्रमाणात तयार झालाही आहे. असा ‘अपवर्डली मोबाइल’ जो वर्ग आहे, अशा वर्गाची समाजातील इतर घटकांप्रती, एकूणच समाजाप्रती असलेली संवेदनशीलता बोथट होताना दिसतेय. ही या वर्गातील लोकांची असंवेदनशीलता खटकणारी वाटली. त्याचे चित्रण कथेत केलेले होते आणि आजच्या काळाला अनुसरून ही कथा पडद्यावर मांडण्यासाठी ‘इन्व्हेंस्टमेंट’ चित्रपट केला, असे दिग्दर्शक रत्नाकर मतकरी म्हणाले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘इन्व्हेस्टमेंट’ हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होत असून, त्या पाश्र्वभूमीवर ‘इन्व्हेस्टमेंट’ चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता’ महापे कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी झालेल्या गप्पांमध्ये दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांच्यासह चित्रपटाच्या निर्मात्या प्रतिभा मतकरी, प्रमुख भूमिकेतील बालकलाकार प्रहर्ष नाईक, अभिनेता तुषार दळवी, अभिनेत्री सुप्रिया विनोद, सहदिग्दर्शक गणेश मतकरी सहभागी झाले होते. आम्हाला जे म्हणणं सरळ, नैसर्गिक पद्धतीने मांडायचे आहे, विशिष्ट सामाजिक विधान करायचे आहे ते ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटाच्या माध्यमातून केले आहे. लोक आधी चित्रपट करण्याचे ठरवितात, नंतर कथा-पटकथा-संवाद-गाणी अशी जुळवणी करतात आणि सिनेमा करतात. याउलट मुळात सांगण्यासारखे काही माझ्याजवळ आहे ते चित्रपट माध्यमातून सांगणे अधिक प्रभावी ठरेल हे जाणवल्यानंतर चित्रपट करण्याचे ठरविले, असे ज्येष्ठ लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांनी प्रांजळपणे सांगितले. जवळपास २००३ च्या सुमारास ‘इन्व्हेस्टमेंट’ ही कथा लिहिली तेव्हापासूनच या विषयावर चित्रपट करण्याची इच्छा होती. परंतु सर्व गोष्टी जुळून येईपर्यंत वेळ लागला म्हणून चित्रपट दिग्दर्शन पदार्पण उशिरा करीत असल्याचेही मतकरी यांनी नमूद केले.
प्रख्यात लेखक, विविध प्रकारच्या कथा-कादंबऱ्यांचे लेखन, बालनाटय़े, नाटकांचे लेखन, मालिकांचे पटकथा-संवाद लेखन अशा विविध स्तरावर प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर स्वाभाविकपणे चित्रपट माध्यमाकडे वळणे तर्कसुसंगत आणि नैसर्गिक ठरले असते. परंतु याकडे वळायला आपल्याला उशीर का झाला, या प्रश्नावर मतकरी म्हणाले की, ‘माझा घर माझा संसार’ या चित्रपटाच्या पटकथा-लेखनानंतर चित्रपट करायची इच्छाही होती. परंतु मधल्या काळात मराठी चित्रपटांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असलेली विनोदाची लाट, सरधोपट पद्धतीने गल्लाभरू चित्रपट करण्याचा प्रघात पडला होता. ते वातावरण माझ्यासारख्या कलावंताला रुचणारे नव्हते. आता ‘श्वास’नंतर काळ माझ्या पद्धतीच्या कलावंतांना पोषक आहे. त्यातच इन्व्हेस्टमेंट या कथेचा विषय सिनेमा करण्यासाठी योग्य आहे असे तीव्रतेने जाणवले तेव्हा चित्रपट दिग्दर्शनात उतरण्याचे ठरविले, असे मतकरी यांनी आवर्जून सांगितले.
तुषार दळवी, सुप्रिया विनोद आणि बालकलाकार व चित्रपटाचा नायक प्रहर्ष नाईक यांनीही चित्रपटात साकारलेल्या आपल्या भूमिकांविषयी आणि एकूणच या चित्रपटाच्या प्रक्रियेविषयी दिलखुलास गप्पा केल्या.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-09-2013 at 06:27 IST

संबंधित बातम्या