लोकशाहीर व संगीतकार शांताराम चव्हाण यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गावरान पाखरू’ या नव्या अल्बमचे नुकतेच प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला मधुकर नेराळे, माया जाधव, देवदत्त साबळे, वामन केंद्रे, प्रकाश खांडगे, मीनल जोगळेकर, ‘युनिव्हर्सल’चे राजन प्रभू, वैशाली सामंत, उत्तरा केळकर, संगीतकार अशोक पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. या अल्बममध्ये एकूण १० लावण्या असून त्या शांताराम चव्हाण, अर्चना गोरे, मैथिली जोशी, उत्तरा केळकर आदी गायकांनी गायल्या आहेत. आकाशवाणीवर चार दशके कार्यक्रम सादर करणाऱ्या व हार्मोनियम, खंजिरी, अॅकॉर्डियन, संतूर आदी वाद्यांमध्ये पारंगत असणारे लोकशाहीर चव्हाण यांनी या लावण्यांना स्वरसाज चढवताना आजच्या तरुणाईच्या पसंतीचा विचार केला आहे. जुन्या-जाणत्या रसिकांसह सध्याच्या पिढीलाही या लावण्या आवडतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. ‘श्यामचे वडील.. एक नवे पर्व’च्या अल्बमचे प्रकाशन अजय पाठक निर्मित ‘श्यामचे वडील.. एक नवे पर्व’ या चित्रपटातील गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन नुकतेच मुंबईत झाले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक हरिहरन, सुरेश वाडकर, वैशाली सामंत, ‘युनिव्हर्सल’चे राजन प्रभू, मंदार गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक समस्या मांडणाऱ्या या चित्रपटात पाच गाणी असून मंदार चोळकर आणि सोहम पाठक यांनी ती लिहिली आहेत. या गीतांना संगीतबद्ध केले आहे ते सोहम-आदित्य-निखिल या तरुण संगीतकारांच्या त्रिकुटाने!ही गाणी हरिहरन, सोहम पाठक आदींनी गायली असून आर. विराज दिग्दर्शित या चित्रपटात तुषार दळवी, रिमा, सुलेखा तळवलकर, चिन्मय उदगीरकर, विनय आपटे, डॉ. मोहन आगाशे, विद्याधर जोशी आदी कलाकार आहेत.