शाळेची इमारत बांधण्यासाठी घेतलेले सात लाख रूपयांचे कर्ज फेडता न आल्याने अंबरनाथ येथील खेर विभागातील गोखले- रहाळकर विद्यालय या मराठी शाळेची इमारत संबंधित बँकेने लिलावात विकली असून शाळेतील ८५० विद्यार्थी आणि शिक्षक अक्षरश: रस्त्यावर आले आहेत.
 ऐन दिवाळीत शाळा इमारत सील करण्यात आल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे काही लाखांच्या कर्जफेडीसाठी कोटय़वधी रूपयांची मालमत्ता विकण्यात आली आहे. याबाबत सारे काही नियमाप्रमाणे असल्याचे भासविण्यात येत असले तरी हा सर्व व्यवहार संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अंबरनाथमध्ये ६३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या या शाळेची जुनी इमारत धोकादायक ठरल्याने १९९९ मध्ये नवी इमारत बांधण्यात आली. त्यासाठी १८ लाख रूपये खर्च आला. त्यापैकी ११ लाख रूपये संस्था चालक, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी गोळा केले. उर्वरित रक्कम उभी करण्यासाठी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या उल्हासनगर शाखेतून सात लाख रूपयांचे कर्ज घेण्यात आले. त्यावेळेपासूनच शाळांना शासनाकडून दिले जाणारे वेतनेतर अनुदान बंद झाले. या शाळेत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थी शिकतात. त्यामुळे शाळेचा दैनंदिन देखभाल खर्च भागवतानाच संस्थेला कसरत करावी लागते. त्यामुळे कर्जाचे हप्ते थकले होते. तरीही संस्था चालकांनी बँकेस २५ जुलै रोजी पत्र पाठवून १० लाख रूपये भरण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार बँकेने २४ ऑगस्ट रोजी पत्र पाठवून ३० ऑगस्ट रोजी सेटलमेंटसाठी बोलावले. मात्र एकीकडे सेटलमेंटची प्रक्रिया सुरू असतानाच जुलै महिन्यातच या इमारतीचा लिलाव करून ही मालमत्ता विकण्यात आली, असा आरोप संस्थेचे अध्यक्ष सगुण भडकमकर यांनी केला आहे.     
* ..तर शाळेचे वर्ग तहसील कार्यालयात
गोखले-रहाळकर शाळा इमारत सूर्योदय हौसिंग सोसायटीत मोडते. सोसायटीच्या जागेवरील भूखंड अथवा इमारतीचा व्यवहार करताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी अनिर्वाय ठरते. याप्रकरणात मात्र तसे करण्यात आलेले दिसत नाही. अत्यंत घाईघाईने बनवाबनवी करून मोक्याचा भूखंड हडप करण्याचा हा डाव आहे. संबंधित संस्थेने कर्ज फेडण्याची तयारी दाखवूनही बँकेने लिलावासारखी टोकाची कारवाई केली आहे. जर दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेच्या इमारतीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही, तर तहसील कार्यालयात वर्ग भरविण्यात येतील,असा इशारा आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे.
*शाळा वाचविण्यासाठी अंबरनाथकर एकवटले
१९४२ च्या दुसऱ्या जागतिक महायुद्धात हरी रहाळकर या भारतीय गुप्तहेराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पती निधनानंतर त्यांच्या पत्नी-विमलाताई यांनी त्यांच्या राहत्या जागेत १९४९ मध्ये ही शाळा सुरू केली. त्यांना सर्व जण मालुताई म्हणत. त्यामुळे मालुताईंची शाळा म्हणूनच अंबरनाथमध्ये तिची ओळख आहे. गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची शाळा असा सुरूवातीपासून लौकिक असणाऱ्या या विद्यालयात आता पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक मिळून एकूण ८७५ विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या सहा दशकात हजारो विद्यार्थ्यांनी या शाळेतून शिक्षण घेतले. त्यापैकी अनेकांनी कर्ज फेडण्यासाठी यथाशक्ती कर्ज फेडण्याची तयारीही दाखवली आहे. शहरातील सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठीत नागरिक आता ही शाळा वाचविण्यासाठी पुढे येत आहेत.  
*लिलाव नियमाप्रमाणेच…!
बँकेने नियमाप्रमाणे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रकरणात संस्था चालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला होता. त्यानंतरच न्यायालयाच्या आदेशानुसार लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आहे. आताही शाळेला यासंदर्भात न्यायालयात दाद मागता येऊ शकते, अशी माहिती या व्यवहारात कोर्ट रिसिव्हर म्हणून काम पाहणारे एन. यू. ठक्कर यांनी दिली.