शास्त्रीय नृत्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी ओदिशा सरकारच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या देवदासी नाटय़ मंडप या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या नृत्यज्योती सन्मानाने विदर्भ कन्या वृषाली प्रसन्न चितळेला सन्मानित करण्यात आले आहे. कसलेली भरतनाटय़म नृत्यांगना आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची विद्यार्थिनी असलेल्या वृषालीने हा मान पहिल्यांदाच  नागपूर शहराला मिळवून दिला आहे. ओडिसी, मोहिनीअट्टम, पाश्चिमात्य नृत्य प्रकारांमधील मॉडर्न डान्स, समूह आणि जोडीनृत्य तसेच कलारीपयट्टू (भारतीय मार्शल आर्ट) यावर प्रभुत्व मिळविणाऱ्या वृषालीने शास्त्रीय नृत्यांमधील प्रभुत्व सिद्ध करतानाच नागपूरच्या सांस्कृतिक मुकुटात नवा शिरपेच खोवला.
शालेय शिक्षणापासून गुणवंत विद्यार्थिनी राहिलेल्या वृषालीने शास्त्रीय नृत्य हेच व्यावसायिक करिअर म्हणून निवडले आहे. नृत्यकलेतील करिअर करताना फक्त स्टेज परफॉर्मन्स एवढाच भाग असल्याचा समज चुकीचा आहे, असे सांगतानाच तिने यात बॅकस्टेज आर्टिस्ट, इव्हेंट मॅनेजमेंट, सूत्रसंचालन, गाणं, समूहनृत्यातील सहभाग असे विविध पर्याय उपलब्ध असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. प्रत्येकात दडलेले टॅलेंट वेगळे असते आणि गुरूकडून त्याची घडण होत गेल्यास यात खूप काही करण्यासारखे आहे, असेही स्पष्ट केले. भारतीय शास्त्रीय नृत्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड लोकप्रियता आहे. यात संशोधनांचे, वेगळ्या प्रयोगांचेही मार्ग खुले आहे, याकडे तिने लक्ष वेधले. सध्या टीव्ही वाहिन्यांवर नृत्याच्या कार्यक्रमांचा महापूर आला आहे. परंतु, शास्त्रीय नृत्याचा पाया असलेलेच यात टिकू शकता. अन्य नृत्यागना आणि नर्तकांची कोणीही दखल घेत नाही, असेही वृषाली म्हणाली.
वृषाली वयाच्या आठव्या वर्षी ज्येष्ठ नृत्यगुरू मीरा चंद्रशेखर यांच्याकडे नृत्य शिक्षणाचे धडे घेण्यासाठी आली. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण नागपूरला झाले. दहावी आणि बारावीतही गुणवंत ठरलेली वृषाली त्यानंतर पूर्णाशाने नृत्याकडे वळली. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नृत्यगुरू डॉ. सुचेता चापेकर यांच्याकडे तिने नृत्यातील बारकावे आणि शैली आत्मसात करण्यासाठी शिष्यत्व पत्करले. नृत्यात करिअर घडविण्याच्या तिच्या महत्त्वाकांक्षेला वडील प्रसन्न आणि आई राही चितळे यांनीही विरोध केला नाही. गुरूकुल पद्धतीने शिकताना वृषालीने पारंपरिक अभ्यासक्रमांना फाटा देऊन नृत्यकलेत चांगले करिअर करता येते, याचे उदाहरण तरुणाईला घालून देतानाच भरतनाटय़मवर मराठी मोहर उमटवली. गेल्या पाच वर्षांपासून तिचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू आहे. वृषालीने मुंबईच्या गंधर्व महाविद्यालयाची मध्यमा पूर्ण (भरतनाटय़म) आणि संगीताची मध्यमा पूर्ण (हिंदुस्थानी) परीक्षा देतानाच यात प्रावीण्य मिळवले.
पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र, गुरुकुलची मास्टर्स इन डान्स (भरतनाटय़म) ही पदव्युत्तर परीक्षाही तिने उत्तीर्ण केली असून यात पीएच.डी. करण्याचे ध्येय ठेवले आहे. वृषालीचे अरंगेत्रम २००८ साली नागपुरात झाले तो तिचा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. यापूर्वी तिने अहमदाबादेतील ‘आज के कलाकार’मध्ये सहभाग नोंदविला होता. मुंबईतील नृत्यांजलीतील आणि गदगच्या भीमसेन जोशी महोत्सवात गेल्यावर्षी वृषीने केलेल्या नृत्याची झलक रसिक प्रेक्षकांनी उचलून धरली. यंदा तिने गोव्याच्या कलांगण महोत्सवात हजेरी लावली. नृत्यकलेच्या भरवशावर स्पिक मॅकेची ‘गुरुकूल अनुभव’ शिष्यवृत्तीही तिला प्राप्त झाली. छत्तीसगडच्या खैरागड विद्यापीठात नागपूरच्या दक्षिण-मध्य क्षेत्र कला सांस्कृतिक केंद्रात आयोजित केलेल्या साधना युवा महोत्सवातील तिचा सहभाग उल्लेखनीय ठरला होता. प्रख्यात नाटककार विजय तेंडूलकर यांच्या ‘आमच्यावर कोण प्रेम करणार’ या मराठी नाटय़ाच्या दिलीप राजगुरूंनी केलेल्या जर्मन अनुवादित नाटय़छटांमध्ये अभिनय आणि नृत्याची चुणूक तिने दाखविली. यामुळे तिला जर्मनीतील डय़ुसबर्ग, इसेन आणि दिनलेकन या शहरांमध्ये भारतीय नृत्यकलेची प्रदर्शन घडविण्यासाठी संधी मिळाली होती. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या नृत्यस्पर्धेत सरफोजी चषकही वृषालीने पटकावला.