scorecardresearch

एमआयएम-वंचित आघाडी एकत्र लढणार; इम्तियाज जलील यांनी दिले संकेत

“एमआयएम-वंचित आघाडी होण अवघड आहे, असं मला वाटत नाही”

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची घोषणा मागील आठवड्यात करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एमआयएम आणि वंचित आघाडी सोबत विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळत आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी याला दुजोरा दिला आहे. “वंचित आघाडीसोबत जाण्यावर पक्ष पुर्नविचार करीत आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही जागांबाबत तडजोड करण्यास तयारी दर्शवली आहे”, अशी माहिती ओवेसी यांनी दिली. एनडीटीव्हीने पीटीआयच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील दुफळी बाहेर येण्यास सुरूवात झाली. त्यानंतर सन्मानजनक जागा न दिल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेत युती तुटल्याची घोषणा केली होती. “२८८ पैकी ८ जागा एमआयएमसाठी सोडत असल्याने युती तोडत आहे”, असे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते. तसेच “वंचितसोबतची युती तोडण्याचा मोठा निर्णय मी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनीच घेतला आहे”, असे जलील म्हणाले होते.

दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांच्याशी पीटीआयने संवाद साधला. वंचितसोबत जाण्यासंदर्भात यावेळी बोलताना जलील म्हणाले,”एमआयएम-वंचित आघाडी होण अवघड आहे, असं मला वाटत नाही. मोठा भाऊ म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावर तोडगा काढला, तर पुन्हा नव्याने सुरूवात करण्याची आमची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींसोबत पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली तर आम्ही तयार आहोत”, असे जलील म्हणाले.

दोन्ही पक्षात समेट घडवून आणण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनीच का पुढाकार घ्यावा, या प्रश्नावर जलील म्हणाले”, “वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ईमेलवरून खासदार ओवेसी यांना जागा देण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यामुळे ओवेसी निराश झाले. ओवेसी यांच म्हणण होत की, “मी बाळासाहेबांना प्रचंड आदर दिला. त्यांनी एक फोनतरी मला करायचा होता. त्यानंतर आपण चर्चा केली असती. पण ईमेलद्वारे जागावाटपाचा प्रस्ताव पाठवणे हे धक्कादायक आहे”, अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिल्याचे जलील यांनी सांगितले. वंचित आणि एमआयएम आघाडी होण्याची काही आशा आहे, का यावर जलील यांनी होकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले,”काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. लोकांना असा पर्याय नको आहे. त्यामुळे मतदार पर्याय म्हणून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडे बघत आहेत. एमआयएम किती जागा लढवेल हे याबाबत आताच निश्चित सांगता येणार नाही. पण जास्तीत जास्त ६० जागा आम्ही लढू. ही संख्या आम्ही पार करणार नाही”, अशी माहिती जलील यांनी दिली.

मराठीतील सर्व मराठवाडा ( Marathvada ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alliance with vanchit bahujan aghadi still possible says aimim leader jalil bmh

ताज्या बातम्या