scorecardresearch

नांदेड : अवयव नेण्यासाठी आलेलं चार्टड विमान धावपट्टीवरून घसरले

चार विमान सेवा केल्या रद्द

अवयव नेण्यासाठी मुंबईहून हवाई रुग्णवाहिकेसह (एअर अँब्युलन्स) आलेलं एक चार्टड विमान नांदेड विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. बुधवारी मध्यरात्री १२ वाजता ही घटना घडली. धावपट्टीवरून घसरल्यानंतर हे विमान चिखलात जाऊन फसले. या घटनेत विमानातील डॉक्टर, वैमानिक आणि सहवैमानिक सुदैवाने बचावले आहेत.

नांदेड येथून अवयव घेऊन जाण्यासाठी एक हवाई रुग्णवाहिका आणि एका चार्टड विमानासह दोन विमाने आली होती. दरम्यान, नांदेडमध्ये जोरदार पाऊस सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री दोन्ही विमाने शहर विमानतळावर दाखल झाली. यावेळी हवाई रुग्णवाहिका व्यवस्थित धावपट्टीवर उतरली. मात्र, उतरत असताना चार्टड विमान धावपट्टीरून घसरले आणि बाजूच्या चिखलात फसले.

घटना घडल्यानंतर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचले. त्यांनंतर विमानातील डॉक्टर, वैमानिक आणि सहवैमानिक यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत अधिकाऱ्यांकडून गुप्तता पाळली जात आहे. विमान अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, या अपघातानंतर दोन्ही विमानांचे परतीचे उडाण थांबवण्यात आले. त्याचबरोबर नांदेड-मुंबई, नांदेड-हैदराबाद, नांदेड-चंदीगड, नांदेड-दिल्ली या चार विमान सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठवाडा ( Marathvada ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chartered plane slipped airport runway at nanded bmh