धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

उस्मानाबाद : करोनाबाधित रुग्ण बरे होण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूच्या निर्मितीसाठी राज्यातील सहकार आणि उद्योग क्षेत्राने पुढाकार घेण्याची गरज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील प्राणवायू प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने उद्घाटन करण्यात आले. साखर कारखान्यातील इथेनॉल निर्मिती उपकरणाच्या सहाय्याने प्राणवायू निर्मिती प्रकल्पाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकणारा धाराशिव साखर कारखाना हा देशातील पहिला कारखाना आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन  दूरचित्रसंचारप्रणालीद्वारे करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय रस्ते विकास आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनीही सहभाग नोंदविला होता.

यावेळी कारखानास्थळी शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. करोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. अशावेळी राज्यातील रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यामुळे राज्याला प्राणवायू उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन प्राणवायूची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अशावेळी साखर उद्योगाने प्राणवायू निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा. पहिल्या लाटेत आपण मोठय़ा प्रमाणावर  चाचणी प्रयोगशाळा, कोविड केअर सेंटर उभारले, खाटांची क्षमता वाढवली. पण दुसऱ्या लाटेचे आव्हान मोठे आहे. मात्र आता राज्याच्या विविध भागातून येणारे अहवाल पाहिले तर या लाटेवरही आपण मात करू शकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करून विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प करोनाविरुद्धच्या लढय़ात अतिशय महत्त्वाचा आहे. यापासून इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. प्रकल्पाबाबत कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी मान्यवरांना माहिती दिली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री पवार व अन्य मान्यवरांनी कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय मंडळाच्या कार्याचे कौतूक केले.