पाणीटंचाईच्या सावटाखाली असलेल्या बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने मुसळधार हजेरी लावली. बीड जिल्ह्यासाठी या हंगामातील हा सर्वात मोठा पाऊस ठरला. सोमवारी सायंकाळी अचानक पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर अधिक असल्याने काही तासांतच शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह अनेक नागरी वसाहतींमध्ये पाणी तुंबले होते.

सुरूवातीपासूनच पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. जूनमध्ये काही भागात चांगली हजेरी लावल्यानंतर पाऊस गायब झाला होता. त्यानंतर म्हणावा तसा पाऊस मराठवाड्यात झाला नाही. दरम्यान, परतीच्या पावसाने मराठवाड्यात पाऊल ठेवले आहे. सोमवारी परभणी, हिंगोलसह बीड जिल्ह्यात परतीचा दमदार पाऊस झाला. सायंकाळी बीड शहरात पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने काही तासांतच शहरातील रस्त्यावरून पाणी वाहू लागले. तर शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते.

बीड शहरातील काही भागात चक्क कमरेइतके पाणी साचले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातही पाणी शिरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस ठाण्यात तीन फुटांपर्यंत पाणी तुंबले होते. दरम्यान, अख्ख्या पावसाळ्यात पहिल्यांदाच बिंदूसरा नदी वाहती झाली. नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने शहरातील दगडी पूलापर्यंत पाणी आले होते.