scorecardresearch

पक्षनिष्ठा : पवार साहेब, मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीत राहिल; कार्यकर्त्याने बॉण्डवर दिलं लिहून

काय म्हणाला दादाराव…

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाणाऱ्या नेत्यांची संख्या कमी नाही. उलट दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. पण, एका कार्यकर्त्यांने पक्षावरील निष्ठा कधीही ढळू देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीत राहिल, असं शंभर रूपयाच्या बॉण्ड पेपरच लिहून दिलं आहे. दादाराव अशोक कांबळे असं या युवा कार्यकर्त्याचे नाव असून, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी आहे. एका विद्यार्थ्यांने दिलेल्या बॉण्ड पेपरमुळे शरद पवारही काही काळ भारावून गेले.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाडच पडले. एकापाठोपाठ एक अशी बाहेर जाणाऱ्या नेत्यांची रीघ लागली. बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून सुरू झालेली ही गळती कोकण, मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या सगळ्याच विभागात राष्ट्रवादीला हादरे बसत आहेत. अशात एका कार्यकर्त्यांने राष्ट्रवादीवरील आपली निष्ठा बॉण्ड पेपरवर लिहून दिली आहे.

गेल्या आठवड्यात शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. उस्मानाबादपासून ते औरंगाबादपर्यंत त्यांनी ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळाव्यांना हजेरी लावली. शुक्रवारी (२० सप्टेंबर) शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यानंतर औरंगाबादेतच मुक्कामी होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शेकडो विद्यार्थी कार्यकर्त्यांनी हॉटेलात गर्दी केली होती, पण सुरक्षेच्या कारणामुळे अनेकांना पवार यांची भेट घेता आली नाही.

पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी शरद पवारांना भेटण्याचा आग्रह धरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. उल्हास उढाण यांनी पवारांची भेट घेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या भावना सांगितल्या. त्यानंतर पवारांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यात एक विद्यार्थी होता दादाराव जगन्नाथ कांबळे! दादारावने पवारांना शंभर रूपयाच्या बॉण्डवर शपथपत्रच लिहून दिले. शरद पवारांनी जेव्हा शपथपत्र वाचले तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवला आणि त्याचे कौतुकही केले.

काय म्हणाला दादाराव…

“मी एक संशोधक विद्यार्थी व आपला कार्यकर्ता आहे, आपल्या विचारांची बांधिलकी जोपासणारा, आपल्या पक्षाची भूमिका अगदी चहाच्या टपरीपासून विद्यापीठातील मेसवर येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर माझ्या बोली भाषेतून मांडत असतो. आपल्या सामाजिक आणि वैचारिक विचाराने झपाटलेला मी सामान्य घरातील विद्यार्थी आहे. सध्याच्या काळात पक्षाची होत असलेली वाताहत पाहून माझे मन खिन्न झाले आहे. साहेब कोणी नेते, मंत्री कुठेही गेले असले, तरी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पुरोगामी विचारांचा वसा सांभाळून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन आणि उभ्या आयुष्यात कधीच पक्ष सोडणार नाही,” अशी भावना त्याने शपथपत्रातून व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठवाडा ( Marathvada ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ill work for ncp till my last breath young activist letter to pawar bmh

ताज्या बातम्या