scorecardresearch

‘मांजरा’तून पाणीपुरवठा होणार बंद : लातुरकरांच्या मानगुटीवर पुन्हा पाणीटंचाईचे भूत

मांजरा धरणात यंदा पाणी आलेच नाही

पावसाने परतीची वाट धरली तरी मराठवाड्यातील बहुतांश भागात पाऊसच झालेला नाही. मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाचे ढग फेर धरू लागले असून, याचा पहिला तडाखा लातुरकरांना बसणार आहे. मांजरा धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. त्यामुळे धरणातून लातूर शहरासह बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील इतर शहरांना करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे. लातूर शहरातील प्रत्येक कुटुंबाला टँकरद्वारे २०० लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी आदेश दिले आहेत.

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या मांजरा नदीवर मांजरा धरण बांधण्यात आले आहे. या धरणातून लातूर शहर आणि जिल्ह्यासह बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरांनाही पाणीपुरवठा करण्यात येतो. दरम्यान, मराठवाड्याकडे यंदाही पावसाने पाठ फिरवली. अनेक भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील जायकवाडी धरण भरले. मात्र, इतर धरणे अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. मांजरा धरणक्षेत्रातही पावसाळा संपत आला तरी अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणात पाणीच आले नाही. गेल्यावर्षी जमा झालेला पाणीसाठा आता तळाला जाऊ लागल्याने धरणावर अंवलंबून असलेल्या शहरांचा पाणीपुरवठा संकटात आला आहे.

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. १ ऑक्टोबरपासून मांजरा धरणातून लातुरसह बीड, उस्मानाबाद शहरांच्या पाणीपुरवठा योजनांचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात लातूर शहरातील प्रत्येक कुटुंबाला टँकरद्वारे २०० लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी आदेश दिले आहेत. मांजरातून होणारा पाणीपुरवठा थांबवल्यानंतर लातुरकरांची पाण्यासाठी फजिती होणार आहे.

भीषण पाणीटंचाईचे प्रचिती लातुरकरांना गणपती विसर्जनालाच आली होती. शंभर वर्षांच्या इतिहासात पाण्याअभावी यंदा पहिल्यांदाच गणेशमूर्तींचे विसर्जन न करता दान करावे लागले. सप्टेंबर अखेपर्यंतच नळाने पाणी देता येईल इतकाच पाणीसाठा लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात शिल्लक आहे. शहरातील जुन्या विहिरींचे कायमस्वरूपी अधिग्रहण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. या विहिरींमध्ये दरवर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात असे. मात्र यावर्षी पाणीच नसल्याने या पाण्याचा वापर पिण्यासाठी करता येईल. त्यामुळे कोणीही गणपती मूर्तीचे विसर्जन करू नये. घरातल्या घरात मूर्तींचे जतन करावे किंवा इतरांना दान द्यावे. शेवटचा पर्याय म्हणून महापालिकेकडे मूर्ती सुपूर्द कराव्यात असे आवाहन करण्यात आले होते.

मराठीतील सर्व मराठवाडा ( Marathvada ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manjara dam water level down water supply to latur will close from october 1 bmh

ताज्या बातम्या