scorecardresearch

जालन्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण

जालना शहरातील दोन खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिस विकाराचे रुग्ण आढळून आले आहेत.

प्राणवायूवरील करोना रुग्णांच्या तपासणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जालना : जालना शहरातील दोन खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिस विकाराचे रुग्ण आढळून आले आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात करोना उपचारासाठी प्राणवायूवर असलेल्या रुग्णांचे नमुने तपासण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, की जालना शहरातील दीपक रुग्णालय आणि जालना क्रिटिकल या दोन खासगी रुग्णालयांत म्युकरमायकोसिस विकाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करोना उपचार घेताना ज्या रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा सुरू आहे त्यांचे नमुने घेऊन त्यांच्यातील म्युकरमायकोसिस विकाराचे निदान करण्यात येत आहे. जया रुग्णांत म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून तपासणी केली जाणार आहे.

दीपक हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय राख यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले, की करोना उपचार सुरू असताना आणि करोनामुक्त झाल्यावरही म्युकरमायकोसिस विकाराचे रुग्ण आढळून आले आहेत. मागील दोन आठवडय़ांत असे आठ रुग्ण आढळून आले असून सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनियंत्रित मधुमेह आणि इतर कारणांनी प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हा विकार करोना रुग्णांमध्ये वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या बुरशीजन्य विकारामुळे नाक, डोळे, जबडा इत्यादींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसतात. त्याचे योग्य निदान करून उपचार करणे आवश्यक आहे. करोनाची लाट येण्यापूर्वीही या विकाराचे काही रुग्ण आढळत होते. करोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून जालना जिल्ह्य़ातही हे रुग्ण आढळून येत आहेत.

उपचार महागडा

करोना रुग्णास प्राणवायू देताना संबंधित पाणी स्वच्छ (डिस्टिल्ड) नसेल तर त्याचा परिणाम डोळे, मेंदू आणि शरीरातील अन्य अवयवांवर होऊ शकतो. म्युकरमायकोसिस विकारांची लक्षणे दिसताच त्यावर उपचार तातडीने सुरू करावे लागतात. या अनुषंगाने जनजागृती आणि निदान महत्त्वाचे असले, तरी औषधोपचारही तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे या विकारावरील औषधी दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय पातळीवरून नियंत्रण घेणे महत्त्वाचे आहे. खासगी रुग्णालयातील औषधोपचार या रुग्णांना परवडणारे नसते. सात दिवस दररोज लस घ्यायच्या तर लाख-दीड लाख रुपये खर्च करणे सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असते. त्यामुळे म्युकरमायकोसिस उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत आणण्याचा विचार समोर आला आहे.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री.

मराठीतील सर्व मराठवाडा ( Marathvada ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Patients myocardial infarction collector inspection corona patients on oxygen ssh