महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, अशी शरद पवारांची कधीच इच्छा नव्हती. निम्मा अधिक महाराष्ट्र कायम तहानलेलाच राहील,यासाठी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले. कारण, त्यांना या सगळ्यातून स्वत:चा राजकीय हेतू साध्य करायचा होता, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी केला. ते सोमवारी नगरमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद , लोकसभेत विरोधी पक्षनेते, केंद्रात सलग १० वर्षे कृषीमंत्रीपद शिवाय राज्यातील पाटबंधारे, वीज अशी महत्त्वाची खाती प्रदीर्घ काळ घरातच उपभोगूनही दुष्काळाच्या प्रश्नावर मोर्चे काढण्याची वेळ पवारांवर आली आहे. मग, त्यांच्या प्रदीर्घ सत्तेच्या काळात त्यांनी काय केले, असा सवाल करताना राज्यातील वीज, पाणी, व ग्रामीण विकासाचा ‘बारामतीकरां’नीच खेळखंडोबा केला, टगेगिरीला पाठबळ दिले, असा थेट आरोप विखे-पाटील यांनी केला.
एकीकडे, पाण्याचे प्रादेशिक वाद निर्माण करायचे आणि दुसरीकडे दुष्काळ पडला की, मराठवाड्याला पाणी द्या असे सांगत, या प्रश्नावर पवारांनी कायम राजकारण केले. त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळाला तेच जबाबदार आहेत, असे बाळासाहेब विखे-पाटील यांनी सांगितले.