आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे हिची यंदाच्या वरिष्ठ महिला नॅशनल स्कॉडमध्ये निवड झाली. सोमवारी दिल्लीत झालेल्या नॅशनल रायफल असोसिएशनच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
तेजस्विनीचा दोन नेमबाजी प्रकारांसाठी वरिष्ठ महिला गटात म्हणजेच देशाच्या मुख्य नेमबाजी संघात समावेश करण्यात आला आहे. यात देशातल्या आघाडीच्या आठ नेमबाजांचा समावेश आहे. यात महाराष्ट्राच्या अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, पूजा घाटकर यांच्यासह तेजस्विनीचा समावेश आहे. तेजस्विनीने ५० मीटर स्पोर्ट रायफल थ्री पोझिशन व ५० मीटर स्पोर्ट रायफल प्रोन या दोन्ही प्रकारांत स्थान मिळवले. मागील वर्षांतील कामगिरी लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली. तेजस्विनीने आतापर्यंत सात देशांत १४ आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग नोंदवत ३ सुवर्ण, ६ रजत, ३ कांस्य अशी १२ पदके पटकावली आहेत. राष्ट्रीय स्तरावर ३८ सुवर्ण, १७ रजत, ७ कांस्य अशी ६२ पदके, तर राज्यस्तरावर ८ सुवर्ण, ९ रजत, १ कांस्य अशी १८ पदके प्राप्त केली आहेत.
तेजस्विनीचे या निवडीबद्दल व्हेरॉकचे व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन, उपाध्यक्ष एम. पी. शर्मा, पोलीस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त सोमनाथ घार्गे, साईचे संचालक वीरेंद्र भांडारकर, महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या अध्यक्षा शीला कानगो, सरचिटणीस अशोक पंडित यांनी अभिनंदन केले.