मौदा व कामठी तालुक्यातील महादुला ग्रामपंचायतीला राज्याच्या नगर विकास विभागाने नगर पंचायतचा दर्जा दिला आहे. विदर्भातील मौदा ही पहिली तर महादुला ही दुसऱ्या क्रमांकाची नगर पंचायत ठरली आहे. कामठी- मौदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे.
 मौदा आणि महादुला येथील मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चा ग्रामपंचायत कायदा संपुष्टात येणार असून यापुढे येथील कारभार आता महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती अधिनियम १९६५ नुसार चालणार आहे. नागरिकांना नगर विकास विभागाच्या अखत्यारितील सर्व सोयी सुविधांचा लाभ नागरिकांना होणार आहे. पूर्वी ४०० वर्ग चौरस मीटर जागेत मुंबई ग्रामपंचायत नियमानुसार नागरिकांना घरबांधणी करता येत होती. आता नगर पंचायतचा दर्जा मिळाल्याने यात वाढ झाली असून १२५० चौरस फुटांमध्ये घराचे बांधकाम करता येईल. प्रशासक नियुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ग्रामपंचायत बरखास्त करून नव्याने निवडणुका घेतल्या जाणार असून नगर पंचायतला जकात कराच्या रूपात निधी मिळणार असल्याने वॉर्डातील विकास कामे झपाटय़ाने होतील. राज्य शासनाचा वर्ग दोन दर्जाचा अधिकारी नगर पंचायतचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त केला जाईल, अशी माहिती आमदार बावनकुळे यांनी दिली आहे.