चंद्रपूर शहर विकास व सौंदर्यीकरणासाठी महापौर राखी कंचर्लावार यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे १६५ कोटींची मागणी केली आहे. यातून सात प्रमुख रस्ते, चार बगीचे, चार स्मशानभूमी, १८ रस्त्यांचे रुंदीकरण, ३१ चौकांचे सौंदर्यीकरण, गोलबाजाराचे आधुनिकीकरण, पाच नाल्यांचे खोलीकरण, भूमीगत विद्युतीकरण व क्रीडांगणाच्या नूतनीकरणाची कामे केली जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत महापौरांनी हा प्रस्ताव सादर केला आहे.
चंद्रपूर शहराच्या पंचशताब्दीच्या निमित्ताने कॉंग्रेस आघाडी सरकारने २५० कोटींचा निधी जाहीर केला होता. मनपाने यातील २५ कोटी खर्च केले नाही. पूर्णत्व प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने उर्वरीत २२५ कोटींचा निधी शासनाने दिला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंचशताब्दीचा निधी मिळणार नाही, असे पहिल्याच बैठकीत जाहीर केले. त्यामुळे आता शहर विकास व सौंदर्यीकरणासाठी महापौर राखी कंचर्लावार यांनी १६५ कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
गेल्या आठवडय़ात पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक घेतली. या बैठकीतच महापौर राखी कंचर्लावार यांनी शहर विकासासाठी १६५ कोटींची मागणी केली. पंचशताब्दीचा निधी न मिळाल्यामुळे शहरातील बहुतांश विकास कामे खोळंबली आहेत. ही सर्व कामे पूर्णत्वास न्यायची असतील तर निधीची नितांत आवश्यकता आहे. तेव्हा अर्थमंत्र्यांनी शहर विकासाला निधीची गरज लक्षात घेऊन ही रक्कम तातडीने द्यावी, असे म्हणणे त्यांनी बैठकीत मांडले.
या १६५ कोटींच्या निधीतून नागपूर रोड ते हवेली गार्डन-जगन्नाथबाबा नगर-दाताळा रोड, पठाणपुरा ते बिनबा गेट, सरई ते रामाळा तलाव, फहिम गेस्ट हाऊस ते चव्हाण टाईल्स फॅक्टरी-रेल्वे स्थानक, ताडोबा रोड ते ख्रिश्चन हॉस्पिटल, आदर्श पेट्रोल पंप ते गुरूद्वारा व जिल्हाधिकारी कार्यालय ते रेल्वे स्थानक या सात रस्त्यांसाठी ५५ कोटी, शहरातील प्रत्येक बगिच्याला ४ कोटी, असे चार बगिच्यांसाठी १६ कोटी, तीर्थरूप नगर, तुकूम, वडगांव, बापटनगर, वडगांव, दीक्षित लेआऊट व बाबुपेठ येथे सोना माता मंदिरजवळ बगीचा, चार स्मशानभूमीसाठी ८ कोटी, शहरातील १८ रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी १८ कोटी, शहरातील ३१ चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी १५ कोटी, यात मिलन चौक, बाविस चौक, टिपले किराणा चौक, गजानन महाराज मंदिर चौक, बिनबा गेट चौक, महात्मा फुले चौक, रेव्हेन्यू कॉलनी चौक, संत कंवरराम चौक, रामनगर चौक, दवाबाजार चौक, गांधी पुतळा जटपुरा चौक, विणकर चौक, जोडदेवून चौक, बालवीर चौक, कस्तुरबा चौक, गुरूव्दारा चौक, बंगाली कॅम्प, वाहतूक शाखा, एमईएल, जुनोना, एसटी वर्कशॉप चौक, बायपास प्रसन्न पेट्रोल पंप, अस्थाना ते गोंडराजा चौक, पठाणपुरा चौक, नेताजी सुभाषचंद्र चौक, संजय नगर चौक, क्रिष्णा नगर चौक, जनता महाविद्यालय चौक, महात्मा फुले चौक, लालपेठ हनुमान मंदिर चौक, श्री टॉकीज चौकांचा समावेश आहे.
तसेच शहरातील मध्यभागातील गोलबाजाराच्या आधुनिकीकरणासह विकसित करण्यासाठी २.५० कोटी, शहरातील मुख्य रस्त्यांवरील पाच नाल्यांच्या खोलीकरणासह बांधकामासाठी ४० कोटी, मुख्य रस्त्यांवरील पोल शिफ्टिंगसाठी ३ कोटी, भूमीगत विद्युतीकरण ५ कोटी, कोनेरी क्रीडांगणाकरिता लाईटींग, रंगरंगोटी व नालीचे बांधकाम ३० कोटी, विविध रस्त्यांवर सूचना फलक व शहर सौंदर्यीकरण १ कोटी, क्रीडांगण नूतनीकरण १ कोटीचा समावेश आहे. पंचशताब्दीचा निधी न मिळाल्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी हा निधी तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी महापौरांनी लावून धरली आहे.
हा निधी मिळाला तरच विकास कामांना तातडीने सुरुवात होईल अन्यथा, कामांना खीळ बसेल, असेही महापौरांचे म्हणणे आहे.