दहीबाजार पुलाच्या उद्घाटनानंतर त्यावर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे राजकारण सुरू झाले आहे. अपूर्णस्थितीत असलेल्या दहीबाजार पुलाचे उद्घाटन घाईघाईने पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते करण्यात आल्यामुळे महापौर अनिल सोले यांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना पत्र पाठविले आहे. पुलाचे काम अजून पूर्ण व्हायचे असल्यामुळे किमान १५ दिवस तो नागरिकांसाठी बंद राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले.
या संदर्भात सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी सांगितले, दहीबाजार पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असताना त्याचे रितसर उद्घाटन होणार होते. त्यासाठी पालकमंत्र्यांसह शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येणार होते. या पुलामध्ये केंद्र व राज्य सरकारसोबत महापालिकेचा वाटा आहे. महापालिका प्रशासनाने पुलाची पाहणी केली होती. मात्र, त्याचे उद्घाटन केव्हा करावे हे ठरविले नव्हते. काँग्रेसच्या काही नेत्यांनी घाईघाईने श्रेय घेण्यासाठी पुलावरील कठडे बाजूला करून पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते उद्घाटन केले. पुलाच्या बांधकामात कोणते अडथळे आहेत, याची पूर्ण माहिती पालकमंत्र्यांना होती. मात्र, काँग्रेसच्या काही नेत्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी उद्घाटन केले. राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून बांधण्यात आलेल्या विविध योजनाच्या उद्घाटनासाठी यापूर्वी पालकमंत्र्यांसह आमदार आणि खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेने कधीच भेदभाव केला नाही. मात्र, पालकमंत्र्यांनी उद्घाटन केले त्यावेळी महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. या संदर्भात महापौरांनी नाराजी व्यक्त करून पालकमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. वतन सिंग अ‍ॅन्ड कंपनीने २० फेब्रुवारीला पुलाचे अवलोकन केले असताना १२ प्रकारची कामे शिल्लक होती. त्यासाठी १५ दिवस लागणार असल्याचे पालकमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले. महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे तक्रार नोंदविली आहे. या पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यासाठी कंत्राटदाराला पोलिसांची मदत द्यावी, अन्यथा अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.