नवी मुंबई पालिकेची निवडणूक चार महिन्यावर येऊन ठेपलेली असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे व महापौर सागर नाईक यांचे अवसान किती गळून गेले आहे याचा प्रत्यय गुरुवारी वाशी येथील भावे नाटय़गृहात झालेल्या पालिकेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने दिसून आला. पालिकेत यानंतर आम्ही असू वा नसू यासारखी भाषा महापौरांनी वापरून लढाईपूर्वीच माजी मंत्री गणेश नाईक यांच्या शिलेदारांनी शस्त्र खाली टाकल्याचे चित्र दिसून आले.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पर्यायी नाईक यांना नवी मुंबईत मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत काय होणार याची चिंता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व नेत्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे काही नगरसेवकांनी ‘भाजप चलो’चा नारा लावला असून त्यासाठी नाईकांनादेखील गळ घातली आहे. गेला एक महिना या भाजप प्रवेशाच्या कांडय़ा रीतसर पिकवल्या जात आहेत. अशा वातावरणात पालिकेचा आजचा २३ वा वाढदिवस साजरा केला गेला. गेली १५ वर्षे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीपद नाईक यांच्याकडे होते, पण त्यांचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांना गुरुवारी बोलविण्याचा प्रश्न आला नाही. त्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्षपद महापौर सागर नाईक यांच्याकडे होते. पालिकेने केलेल्या कामांची जंत्री सांगितल्यानंतर नाईक यांनी उद्या आम्ही पालिकेत असू वा नसू अशी अशी भाषा करण्यास सुरुवात केली. नाईक यांनी आपल्या कुटुंबातील एकही सदस्य यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे पालिका सभागृहात यावेळी ‘नाईक’ दिसणार नाहीत. त्या अर्थानेदेखील नाईक पालिकेत नाही, पण पालिकेची सत्ता आणण्याची जबाबदारी नाईक यांचीच राहणार असून नाईक यांच्या संस्थानातील एक सरदार महापौर सागर नाईक निर्वाणीची भाषा वापरत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अशी हतबलतेची भाषा कार्यकर्त्यांचे उरलेसुरले अवसान गाळणारी आहे. राष्ट्रवादीतील नगरसेवकांच्या पायाखालील वाळू केव्हाच सरकली आहे, पण नाईकांच्या नेत्यांचीही तीच स्थिती झाल्याचे गुरुवारी दिसून आले. महापौर सागर नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदार संघाची धुरा सांभाळली होती, त्या ठिकाणी थोडय़ा मताने नाईकांचा पराभव झालेला आहे.