विविध राजकीय पक्ष, तसेच उमेदवारांच्या हालचालींवर जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘मिडिया सेंटर’च्या तिसऱ्या डोळय़ाचे बारीक लक्ष आहे. जाहीरसभा, कॉर्नर सभांसोबतच प्रत्येक झोपडपट्टी, बुथ, प्रभाग व वॉर्डात होणाऱ्या पक्षांच्या राजकीय घडामोडी, तसेच वृत्तपत्रांच्या बातम्यांवर हा तिसरा डोळा लक्ष ठेवून असल्याने उमेदवारांची कोंडी झाली आहे.
येत्या १० एप्रिलला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात निवडणूक होत आहे. कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, आप, रिपाई, बसप यासह विविध राजकीय पक्षांचा प्रचार कोणत्या प्रकारे होत आहे व या पक्षांकडून कोणतेही आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मिडिया सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या नेतृत्वाखाली मिडिया सेंटर सर्व दृष्टीने राजकीय पक्षांच्या, तसेच उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. या मिडिया सेंटरच्या माध्यमातून पेड न्युजवर नियंत्रण ठेवणे, वर्तमानपत्रात प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींवर नजर ठेवणे, आक्षेपार्ह वृत्तांवर नजर ठेवण्यात येत असून या मिडिया सेंटरच्या कार्यालयात ४ एलसीडी टी.व्ही. व एका संगणकाच्या माध्यमातून स्थानिक वाहिनीवर येणाऱ्या जाहिरातींवर नजर ठेवण्यात येत आहे. यात टी.व्ही मॉनेटरिंग, सोशल मिडिया, पेड न्युज सेक्शन, वर्तमानपत्रातील जाहिराती यावर करडी नजर २४ तास ठेवण्यात येत आहे.
विविध वर्तमानपत्रांमध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांसंदर्भात प्रकाशित झालेल्या बातम्यांची कात्रणे गोळा करणे, तसेच पेड न्यूजचा वास एखाद्या बातमीत आला असेल तर त्याचे कात्रण वेगळे काढून ठेवणे, त्या बातमीची नोंद घेणे, निवडणूक आयोगाला त्याचे कात्रण मेल व फॅक्स करणे या नोंद घेण्यात येत आहेत. या कार्यालयात या स्थानिक वाहिन्यांची २४ तास चित्रफित करण्यात येत असून यावर नजर ठेवण्यात येत आहे. या मिडिया सेंटरमध्ये ६ सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यात जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, कृष्णकांत खानझोडे, प्रकाश ऊमतकर, राहुल मन्नारे, संदीप वाघ, रवींद्र कु मार आदींचा समावेश आहे. या मिडिया सेंटरमध्ये एक कॅमेरामॅन व फोटोग्राफरही नेमण्यात आला आहे व सर्व सदस्यांबरोबर रोज सकाळी बैठक घेण्यात येत आहे. या सेंटरमध्ये एक कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीचे ‘माध्यम प्रमाणिकरण आणि सहाय्यक नियंत्रण समिती’ असे नाव आहे. यात जिल्हाधिकारी, निवडणूक सहाय्यक अधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी या कमिटीचे सदस्य आहे. यांच्यामार्फत हे काम बघितले जाते. कोणत्याही व्यक्तीने जर आचारसंहितेचा भंग केला, तर या मिडिया सेंटरने तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०७७, ०७१७२-२५१५९७, १८००२३३४३३४ उपलब्ध करून दिला आहे. आचारसंहितेचा भंग झाला, असे निर्दशनास आल्यास आचारसंहितेनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी सांगितले. यासाठी पोलीस सायबर सेलचीही मदत घेण्यात येत आहे.
जिल्ह्य़ातील इतर विधानसभा मतदारसंघात एक चमू स्थापन करण्यात आला असून सहाय्यक निवडणूक अधिकाऱ् यांमार्फत तेथे लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार या सेंटरकडे आल्यास याची तपासणी करण्यात येणार व संबंधित व्यक्तीवर तक्रार करण्यात आली असल्यास त्याला राज्यस्तरीय माध्यम निरीक्षण समितीकडे दाद मागता येते.
या मिडिया सेंटरमुळे पेड न्युजवर आळा बसला आहे, अशी माहिती देण्यात आली.