विकासप्रक्रियेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून माध्यमांनी सर्वसामान्य जनतेच्या वास्तव प्रश्नांना प्राधान्य द्यावे. अवास्तव बाबींना प्रसिद्धी देऊ नये, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय व पत्रकार, संपादक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी शिक्षणाधिकारी, तसेच साहित्यिक संभाजी होकम, पत्रकार संघाचे अध्यक्ष कांतीभाई सूचक, साप्ताहिक मायमाऊलीचे संपादक प्रकाश ताकसांडे, जिल्हा महिती अधिकारी रामचंद्र गोटा, संपादक केशवराव दशमुखे, नरेंद्र माहेश्वरी, मुकुंद जोशी, मुनिश्वर बोरकर, रेखा वंजारी, नालंदा देशपांडे आदी उपस्थित होत्या.
इरपाते म्हणाले की, सध्या विविध माध्यमांमध्ये स्पर्धा सुरूअसून या युगात आपली बातमी प्रथम कशी प्रसिद्ध होईल, यासाठी चढाओढ लागलेली असते.
बातमी प्रसिद्धीला देण्याच्या ओघात बातमी खरी की, खोटी याची शहानिशा न करता अनेक माध्यमांमधून बातमी प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे त्या बातमीची विश्वासार्हता राहत नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची चढाओढ असली तरी वृत्तपत्र वाचनाकडे अजूनही वाचकांची रुची आहे. वृत्तपत्रांनी व माध्यमांनी वृत्त देताना सत्यता पडताळूनच ते प्रसिद्ध करावे. माध्यमांना स्वातंत्र्य असल्याने समाजात जागृती निर्मिती करण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी संभाजी होकम, कांतीभाई सूचक यांनी माध्यमांचे स्वातंत्र्य या विषयावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र गोटा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची धुरा संजय चांदेकर यांनी, तर आभार प्रकाश ताकसांडे यांनी पार पाडली. या कार्यक्रमाला पत्रकार, संपादक, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी प्रभाकर कोटरंगे, आनंदराव नेवारे, कमल किशोर मारोठे उपस्थित होते.
.