‘‘देशातील ग्रामीण भागामध्ये दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागामध्ये काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी भारती विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांना केले.
भारती विद्यापीठाचा चौदावा पदवी प्रदान सोहळा झाला. यावेळी ४९ विद्यार्थ्यांना पीएचडी, २ हजार ३३१ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, ३ हजार ४६ विद्यार्थ्यांना पदवी आणि ८६४ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. यावर्षी विविध विद्याशाखांमध्ये २९ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आझाद म्हणाले, ‘‘सामाजिक आरोग्याच्या सुधारणेसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. आरोग्यक्षेत्रामध्ये चांगले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. बेड ऑक्युपन्सी नॉर्म्स, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांमागे शिक्षकांचे प्रमाण अशा अनेक बाबींमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. एम.बी.बी.एस. आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश क्षमतेमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
यावर्षी एम.बी.बी.एस.च्या प्रवेश क्षमतेमध्ये पन्नास टक्क्य़ांपर्यंत आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेमध्ये शंभर टक्क्य़ांपर्यंत वाढ करण्यात येणार असून वैद्यकीय शिक्षणव्यवस्थेमध्ये हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. पॅरामेडिकल क्षेत्रातही मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले निर्णय घेण्यात आले आहेत.’’ संशोधन क्षेत्राबद्दल आझाद म्हणाले, ‘‘भारतीय शिक्षणव्यवस्थेचे जागतिक पातळीवर कौतुक होते. मात्र, तरीही संशोधन क्षेत्रामध्ये भारताकडून अधिक काम होणे गरजेचे आहे. संशोधन क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर ठसा उमटवण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांच्या निर्मितीचीही गरज आहे.’’