महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ असल्याच्या तक्रारी विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी केल्या आहेत. त्यामुळेच या याद्यांवर मोठय़ा प्रमाणावर हरकती दाखल होण्याची शक्यता आहे.
मनपाच्या नव्या प्रभागरचनेनुसार प्रारूप मतदारयाद्या बुधवारी प्रसिद्ध झाल्या. त्यावर हरकती घेण्यासाठी येत्या दि. ३०पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर काही वेळातच राजकीय पक्ष व निवडणुकीतील इच्छुकांना प्राप्त झाल्या. बुधवारी एका प्रभागाच्या तीन मतदारयाद्या देण्यात आल्याचे समजते.
मतदारयाद्या मिळाल्यापासून त्यातील घोळांचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मतदारयादीत बहुसंख्य मतदारांची छायाचित्रेही आहेत. ज्यांची छायाचित्रे नाहीत, त्यांच्या नावापुढे तसा स्पष्ट उल्लेख आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दि. १ ऑक्टोबर ही अर्हता दिनांक गृहीत धरून या मतदारयाद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यासाठी दि. ३० सप्टेंबपर्यंत मतदारनोंदणी सुरू होती. मात्र सप्टेंबरमध्ये नोंदणी केलेली नावे या याद्यांमध्ये समाविष्टच करण्यात आल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. ही नावे अंतिम यादीच्या वेळी पुरवणी यादी म्हणून यात समाविष्ट केली जाण्याची चर्चा असली तरी तसे कोणीही अधिकृतरीत्या स्पष्ट केलेले नाही.
नव्या प्रभागरचनेनुसार याद्या तयार करताना जवळजवळ प्रत्येक प्रभागातच मोठे घोळ झाल्याचे दिसते. अनेक ठिकाणची नावे अन्य शेजारील प्रभागाच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. शहरातील सुमारे ५३ हजार नावे विविध कारणांनी या यादीतून वगळण्यात आली आहेत. दुबार नोंदणी, मृत, स्थलांतरितांचा त्यात समावेश आहे. हे काम अत्यंत काटेकोर व विशिष्ट प्रणालीद्वारे करण्यात आल्याचे सांगण्यात येते, मात्र अनेकांची नावे अशी आहेत, की जी वगळलेल्या यादीतही आहेत आणि मतदारयादीतही आहेत. वगळलेल्या नावांवरच ‘डिलिटेड’ असा शिक्का मारण्यात आला असून, त्याव्यतिरिक्त यादीच्या शेवटीही ही वेगळी यादी देण्यात आली आहे. अन्य प्रभागांत गेलेली नावे शोधणेही कठीण होऊन बसल्याचे सांगण्यात येते. याशिवाय पूर्वी यादीत असलेली काही नावे या यादीत मात्र विनाकारण वगळली गेल्याचेही प्रकार झाल्याचे सांगण्यात येते.
यादी तयार करतानाच झालेल्या या गोंधळामुळे आता हरकती घेऊन या चुका दुरुस्त करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र त्यातही फारसा बदल होतो किंवा नाही याबाबतच्या संशयाने अनेक इच्छुक धास्तावले आहेत. दरम्यान, राज्या निवडणूक आयोगाकडून आलेल्या याद्या मनपाने प्रसिद्ध केल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.