आठवडाभरात तांत्रिक बिघाडाची हॅट्ट्रिक करून उपनगरीय रेल्वेने प्रवाशांना मनस्ताप देण्याचा विक्रम केला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये वीसहून अधिक वेळा तांत्रिक बिघाडांमुळे सेवा विस्कळीत झाल्याचा त्रास रेल्वे प्रवाशांना सहन करायला लागला आहे. अशा परिस्थितीत रेल्वेच्या हलगर्जीपणा विरोधात आवाज उठवून प्रशासनाला धारेवर धरण्याची गरज असताना ठाणे, कल्याण आणि भिवंडी याप्रमुख विभागांतील खासदारांनी मात्र मौन पत्करले आहे. या भागातील खासदारांकडून प्रवाशांशी संवाद साधण्याचे प्रयत्नच केले जात नसून पूर्वीच्या खासदारांनी सुरू केलेल्या ‘खासदार तुमच्या स्थानकात’सारख्या परंपरा यामुळे मोडीत निघाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा कोणीच वाली नसल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. निवडून आल्यानंतर या तिन्ही खासदारांनी फक्त एकदा स्थानकांना भेटी दिल्या. त्यानंतर मात्र त्यांना प्रवाशांकडे सपशेल पाठ फिरवली आहे.
रेल्वे रुळांना तडा, रेल्वे ओव्हरहेड वायर, पेंटाग्राफ तुटणे, पावसामुळे रेल्वे बंद, सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड आणि प्रत्येक रविवारचा मेगा ब्लॉक अशा अनेक कारणांमुळे रेल्वे प्रवाशांना विस्कळीत सेवेचा फटका बसत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाला त्याबाबत सोयरसुतक नाही. प्रवाशांना आपल्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाशी संघर्ष करावा लागत आहे. अशा वेळी प्रवाशांना या भागातील लोकप्रतिनिधी आणि खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासते. मात्र खासदारांनी प्रवाशांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून काही खासदारांना तर या नियमित होणाऱ्या बिघाडाची कल्पनाच नसल्याचे दिसून येत आहे. देखभाल दुरुस्तीसाठी दर रविवारी घेतला जाणारा मेगा ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. विशेष म्हणजे अशी देखभाल दुरुस्तीची कामे करूनही विविध ठिकाणी बिघाड निर्माण होतच आहेत. मध्य आणि ट्रान्स हर्बर मार्गावरील या समस्या कायम असताना त्याचा पाठपुरावाच केला जात नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. ठाणे स्थानकात तर चोरांचा सुळसुळाट वाढला असून त्यांच्या हल्ल्यांमध्ये प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. रेल्वे फलाट आणि फुटबोर्ड यांच्यातील जीवघेण्या पोकळीतून मृत्यू पावणाऱ्या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा समस्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खासदारांकडून अपेक्षा असताना त्यांनी मात्र या तीन महिन्यांत स्थानकांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ‘खासदार तुमच्या स्थानकात’सारखे उपक्रमसुद्धा कमी होऊ लागले असल्याचे प्रवासी सांगत आहेत.  
यापूर्वी खासदार प्रत्येक स्थानकात आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि प्रवासी संघटनांच्या माध्यमातून प्रवाशांच्या समस्या जाणून घेत होते. खासदार स्थानकात आल्याने रेल्वे प्रशासन खडबडून जागे होत तात्पुरती का होईना मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे खासदारांनी वारंवार स्थानकात येऊन येथील समस्या जाणून घ्याव्यात आणि रेल्वे प्रशासनाला जाब विचारावा अशी प्रवाशांची अपेक्षा असते. मात्र नवनियुक्त खासदारांकडून तशा पद्धतीचे उपक्रम अत्यंत कमी प्रमाणात राबवले जात आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हे तीन महिने बुरे दिन..आल्यासारखेच होते, अशी संतप्त प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.

रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आग्रही..
रेल्वेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ठाणे स्थानकातील वातानुकूलित स्वच्छतागृहाचे काम पूर्ण होत आले आहे. पुढील काही महिन्यांमध्ये स्थानकात लिफ्ट, सॅटीसचे छत अशी कामेही पूर्ण होणार आहे. मुंबई-ठाणे परिसरातील सर्व स्थानकांचा विकास खासगी संस्थांच्या मदतीने करण्यासाठीच्या सूचना आपण अधिवेशनातील भाषणात केली आहे.
 खासदार राजन विचारे, ठाणे.

समस्या आमच्यापर्यंत येतच नाहीत..
रेल्वे प्रवासी आमच्याकडे तक्रारीच करीत नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या समस्या आमच्यापर्यंत पोचतच नाहीत. कुणी तक्रार केली तरच त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. खासदार झाल्यानंतर आम्ही तात्काळ स्टेशन भेट देऊन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर अधिवेशन सुरू झाल्याने स्टेशन भेटी शक्य झाल्या नाहीत. आता मात्र रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्याचा प्राधान्याने प्रयत्न करणार आहे.   
 खासदार कपिल पाटील, भिवंडी.