वीजबिले थकविणाऱ्या ग्राहकांच्या बाबतीत ‘महावितरण’ने अत्यंत कठोर धोरण अवलंबले असून, थकबाकीदारांचा वीजमीटर व वीजवाहिनी काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील १९ टक्के भागांमध्ये विजेची वितरण व वाणिज्यित हानी अधिक असल्याने त्या भागामध्ये सध्या वीजकपात करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर बिलाच्या थकबाकीदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘महावितरण’ची वीजबिल वसुलीची मोहीम सध्या सुरू आहे. वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई या मोहिमेमध्ये करण्यात येते. मात्र, वीजपुरवठा खंडित केल्यानंतर परस्पर अनधिकृतपणे वीजपुरवठा सुरू करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा ग्राहकांवर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
परस्पर वीजजोड पूर्ववत करण्याचे प्रकार होत असल्याने थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर त्याच्या मीटरचे रिडिंग घेतले जाईल. त्यानंतर वीजमीटर व सव्र्हिस वायर काढून टाकण्यात येईल. या दोन्हीही गोष्टी संबंधित शाखा कार्यालयात जमा करण्यात येतील. थकबाकीदाराने देयकाचा भरणा केल्यानंतर लगेचच मीटर पुन्हा जोडून देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत ग्राहकाकडे इलेक्ट्रोमॅकॅनिकल मीटर असल्यास त्याऐवजी शहरी भागात रेडिओ फ्रिक्वेंसी, तर ग्रामीण भागात अन्फ्रारेट मीटर लावण्यात येतील.थकबाकी वाढीमुळे होणारी वीजकपात टाळण्यासाठी ‘महावितरण’कडून कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तातडीने वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.