वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गासाठी आणण्यात आलेल्या आलिशान मेट्रो गाडय़ांचा कमाल वेग ताशी सुमारे ८० किलोमीटर असला तरी त्या कधीच पूर्ण वेगाने धावू शकणार नाहीत. मेट्रोच्या मार्गावरील दोन स्थानकांमधील अंतर अवघे पाऊण ते दीड किलोमीटर असल्याने पूर्ण वेग धरण्याच्या आधीच पुढचे स्थानक येणार. त्यामुळे मेट्रोच्या वेगाला स्थानकांच्या रचनेचा ब्रेक बसला आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. या मेट्रो मार्गावर वसरेवा, डी. एन. नगर, आझाद नगर, अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्ग, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकीनाका, सुभाष नगर, असल्फा रोड आणि घाटकोपर अशी १२ स्थानके आहेत. एवढय़ाशा अंतरात तब्बल १२ स्थानके असल्याने दोन स्थानकांमधील अंतर अवघे पाऊण किलोमीटर ते फारतर दीड किलोमीटपर्यंत आहे. याचा परिणाम मेट्रोच्या वेगावर होणार आहे. ताशी ८० किलोमीटर हा मेट्रोचा कमाल वेग गाठण्यासाठी दोन स्थानकांमध्ये अंतरच नसल्याने या वेगाला ब्रेक बसणार आहे. फार तर ताशी ४०-४५ किलोमीटर हा वेग गाठता येईल, असे ‘एमएमआरडीए’च्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
सध्याच्या नियोजनानुसार वसरेवा ते घाटकोपर हा संपूर्ण प्रवास २१ मिनिटांत होणार आहे. त्यामुळे त्यासाठी ताशी ३० ते ३५ किलोमीटर इतका वेग ठेवण्यात येणार आहे. मेट्रोच्या वेगाची पूर्ण क्षमता या मार्गावर वापरात येणार नसली तरी प्रवाशांना त्याचा फटका बसणार नाही. सध्याच्या वाहतूक कोंडीतून किमान एक तास घालवण्याऐवजी अवघ्या २१ मिनिटांत त्यांना हा प्रवास करता येणार आहे.