अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांचे डोळे मध्य वैतरणातून प्रतिदिनी मिळणाऱ्या ४५५ दशलक्ष लिटर पाण्याकडे लागले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संथगतीने मध्य वैतरणावरील पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे यंदाही मध्य वैतरणातील पाणी मुंबईकरांच्या मुखी लागण्याऐवजी समुद्रात वाहून जाणार आहे.
मुंबईकरांची वाढती तहान भागविण्यासाठी महापालिकेने २००८ मध्ये ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कोचाळे येथे मध्य वैतरणा प्रकल्पाचे हाती घेतले होते. या प्रकल्पाचे काम सी. डब्ल्यू सोमा कंपनीस देण्यात आले. हे काम ५२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याची अट या कंपनीवर घालण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात या कंपनीने ३८ महिन्यांमध्ये धरणाचे काम पूर्ण केले. विक्रमी वेळेत धरण उभे राहिले. मात्र धरणात पाणी साठविल्यानंतर कसारा आणि जव्हार तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील एक पूल पाण्याखाली जाणार होता. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांचा संपर्कच तुटणार होता. ही बाब लक्षात घेऊन विहीगाव येथे नवा पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. नवा पूल उभारण्याचे काम गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल अशी पालिकेची अपेक्षा होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संथगतीमुळे हा पूल पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी धरणात साठणारे पाणी सोडून द्यावे लागले होते. गेल्या वर्षभरातही सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम पूर्ण करता आलेले नाही. गेल्या महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौर सुनील प्रभू यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत विहीगाव येथील पुलाची पाहणी केली होती. २१ जून रोजी काम पूर्ण करण्याचे आश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही.
सध्या मध्य वैतरणावर ३८० मीटर लांबीचा, ५३ मीटर उंचीचा पूल बांधण्याचे काम सुरू आहे. पुलाचे काम अंतीम टप्प्यात आले असून मधला एक गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. गेले वर्षभर अत्यंत संथगतीने हे काम सुरू होते. या पुलाखाली खोल घळ आहे. त्यामुळे कामात अडचणी होत्या. दोन्ही बाजूने गर्डर टाकूनन बहुतांश पूल पूर्ण करण्यात आला असला तरी मध्यभागातील गर्डर टाकण्याचे आव्हान कंत्राटदाराला अद्याप पेलता आलेले नाही. मध्यभागात बसविण्याचा गर्डर तेथे आणून ठेवण्यात आला आहे. पण त्याच्या बोल्डचा ताळमेळ बसत नसल्याने कंत्राटदार चक्रावला आहे. सध्या सोसाटय़ाच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे तेथे काम करणे शक्यच नाही. त्यामुळे यंदाही मध्य वैतरणामध्ये पाणी साठविणे शक्य नाही. स्वाभाविकच ते मुंबईकरांच्या मुखी लागण्याचीही शक्यता नाही.