पुणे जिल्ह्यातील बारामती येथून दीड वर्षांपासून बेपत्ता असलेला १७ वर्षीय युवक मनमाड पोलिसांच्या जागरूकतेमुळे सापडला. त्याची चौकशी करत पोलिसांनी त्याला त्याची आई आणि बारामती पोलिसांच्या ताब्यात दिले.
अजिबा रामचंद्र नांगरे हा युवक मार्च २०१२ पासून बेपत्ता होता. प्रेमप्रकरणाच्या संशयावरून त्याला जबर मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर अजिबाचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत त्याच्या आईने बारामती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. बारामती येथे त्या वेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते. जखमी अवस्थेतील अजिबावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. त्यानंतर भीतीपोटी तो आपल्या घरी न जाता इतरत्र भटकट होता.
बुधवारी रात्री मनमाड पोलिसांची गस्त सुरू असताना अलंकार चित्रपटगृहासमोरील एका ओटय़ावर अजिबा हा विमनस्क अवस्थेत बसलेला पोलीस कर्मचारी रवी चौधरी यांना दिसला. त्यांना संशय आल्याने त्यांनी त्या युवकाची सखोल चौकशी केली. त्याला पोलीस ठाण्यात आणले. अश्रू ढाळत अजिबाने आपल्यावर गुदरलेला प्रसंग पोलिसांना कथन केला. त्याची सर्व चौकशी करून बारामती पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधण्यात आला. अजिबाने सांगितलेल्या प्रेमप्रकरणाची सत्यताही पडताळून पाहण्यात आली. त्यानंतर बारामतीचे पोलीस पथक व अजिबा यांची आई मनमाडला दाखल झाले. मनमाड पोलिसांनी अजिबा याला पोलीस आणि त्याच्या आईच्या ताब्यात दिले.