शहरातील उड्डाणपुलाबाबत मंत्रालय स्तरावर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी काही करणे सोडून फक्त इथेच पोकळ चर्चा करणारे शहराचे २ आमदार, खासदार नगरकरांची निव्वळ दिशाभूल करत आहेत अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली.
पुलाचे काम सुरू व्हावे यासाठी मनसेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयासमोर शहरातील लोकप्रतिनिधींची बुजगावणे अशी संभावना करत त्यांच्या पुतळ्यास चपलांनी मारहाण करत ढोलबजाव आंदोलन करण्यात आले. नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भोसले, वसंत लोढा, जिल्हाध्यक्ष कैलास गिरवले, जिल्हा संघटक सचिन डफळ, शहराध्यक्ष सतीश मैड, संजय झिंजे, गजेंद्र राशीनकर, गणेश शिंदे, नितीन भुतारे, अशोक दातरंगे, वैभव सुरवसे, अनिल दळवी, श्रद्धा बाबर, सुमित डफळ आदी यात सहभागी झाले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ. व्यं. खैरे यांनी आंदोलकांबरोबर चर्चा करून त्यांना या विषयाची सविस्तर लेखी माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबधित ठेकेदाराला दंड केला आहे, पुलाचे काम होत नसल्यामुळे तो वसूल करत असलेल्या टोलचा दर कमी करण्याबाबत मंत्रालयात प्रस्ताव दिला आहे, पुलाच्या कामाचा खर्च वाढल्यामुळे ठेकेदार नकार देत असून त्यामुळे अंदाजपत्रकात तरतुद करून हे काम करावे असेही त्यांनी सरकारला सुचवले असल्याचे खैरे यांनी सांगितले.
त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात केलेल्या भाषणात शहरातील लोकप्रतिनिधींवर टीकेचे आसूड ओढले. तिन्ही मंत्री, शहरातील २ आमदार, १ खासदार मंत्रालयात हा विषय उपस्थित करू शकतात, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विषयाचे महत्त्व पटवून देऊ शकतात, मात्र ते तसे काहीही करत नाहीत व इथे नगरमध्ये तोंडदेखली आंदोलने करून, जिल्हाधिका-यांना बैठकीचे पत्र देऊन नगरकरांची दिशाभूल करत आहेत अशी टीका सर्वश्री लोढा, डागवाले, भोसले, गिरवले यांनी यावेळी केली.
लोढा यांनी या वेळी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याबरोबर संपर्क साधून पुलाच्या कामाबाबत काही हालचाल केली नाही तर नगरमध्ये मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या गाडीला घेराव घालतील असा इशारा दिला. पाचपुते यांनी शहरातील सर्वपक्षीय पदाधिका-यांना घेऊन पुढील आठवडय़ात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भूजबळ यांच्यासमवेत मुंबईत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. लोढा, डागवाले, भोसले, गिरवले, डफळ यांनी सांगितले की मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. वेळ पडली मनसेच्या वतीने मंत्रालयातच भूजबळ यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला व कोणत्याही परिस्थितीत मनसे या विषयावर सकारात्मक निर्णय करून आणणारच असा निर्धार व्यक्त केला.