अधिवेशनाच्या तोंडावर आमदार निवासाची डागडुजी

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाच दिवसावर आलेले असताना राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची निवास व्यवस्था असलेल्या आमदार निवासात अजूनही रंगरंगोटी आणि डागडुजीची

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाच दिवसावर आलेले असताना राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची निवास व्यवस्था असलेल्या आमदार निवासात अजूनही रंगरंगोटी आणि डागडुजीची कामे सुरू आहेत. गेल्या वर्षीच आमदार निवासमधील प्रत्येक खोलीमध्ये आणि परिसरात रंगरंगोटी केल्यानंतर यावर्षी पुन्हा त्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. अनेक खोल्यांमधील सामान मधल्या काळात गहाळ झाल्याने ते पुन्हा खरेदी केले जात आहे, त्यामुळे आमदार निवासाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  
हिवाळी अधिवेशनानिमित्त उपराजधानीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लगबग वाढली असली तरी कामाची गती मात्र अतिशय संथ आहे. अधिवेशनाला पाच दिवस शिल्लक असताना आमदार निवासमध्ये अनेक खोल्यांमध्ये अजूनही रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. आमदार निवासचे काम ज्या कंत्राटदारांकडे देण्यात आले आहे, त्यांचे कामगारांवर लक्ष नसल्यामुळे सर्वच मनमानी कारभार सुरू आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ९ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असल्यामुळे आमदार निवास परिसरात विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. अनेक लोकप्रतिनिधींचे स्वीय सचिव आणि कार्यकर्ते खोल्यांचा ताबा घेण्यासाठी उपराजधानीत आले आहेत. आमदार निवासमधील इमारत क्रमांक १ मधील सर्व खोल्यांचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी इमारत २ व ३ मधील अनेक खोल्यांमध्ये रंगरंगोटी आणि डागडुजीची कामे सुरू आहेत. टीव्ही, फ्रीज, आलमारी, डीनरसेट, दूरध्वनी, टेबल, खुच्र्या, पलंग आदी व्यवस्था खोलीमध्ये असली पाहिजे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दडपण आणले जात आहे. खोल्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांवर दमदाटी करून त्यांना कार्यकर्त्यांंकडून कामे सांगितली जात असल्याचे दिसून आले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची निवासाची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी अनेक लोकप्रतिनिधींच्या खोल्यांमध्ये असलेले सामान मधल्या काळात गहाळ झाल्याने ते पुन्हा खरेदी केले जात आहे. परिसरात फेरफटका मारला असता सुरक्षा नावाचा प्रकार कुठेच दिसून आला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सर्व व्यवस्थेची पाहणी करून कुठे काही कमी पडू नये याची दक्षता घेत असले तरी काम संथ गतीने सुरू आहे. १०० पेक्षा अधिक कामगार आमदार निवासमध्ये असून त्यातील अर्धे कामगार परिसरात फिरताना दिसतात.
 जवळपास बहुतेक आमदारांच्या खोल्या ठरलेल्या असल्यामुळे फारसा बदल राहणार नाही. विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची शहरातील विविध पंचातारिकत हॉटेल्समध्ये निवास व्यवस्था केली जात असल्यामुळे त्यांच्या नावाने असलेल्या खोल्यांचा ताबा हा स्वीय सचिव किंवा कार्यकर्त्यांकडे असतो. अनेक आमदार तर आमदार निवासकडे फिरकत नसल्याचा गेल्या अनेक वर्षांंचा अनुभव असल्यामुळे यावर्षी आमदार किंवा त्यांचे स्वीय सचिव  खोलीमध्ये राहत असतील तरच परवानगी देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता मोरोणे यांनी सांगितले.
इमारत क्रमांक एकमध्ये १३२ खोल्या, दोनमध्ये १८३ व तीनमध्ये ३२ खोल्या आहेत. बहुतेक सर्व खोल्याचे वाटप आमदारांच्या नावाने करण्यात आले आहे. आमदार निवासातील खोल्यांचे वाटप सांसदीय मंडळ व आमदार निवासाच्या अध्यक्षांकडे असते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष व सभापती यांच्या २०, विद्यार्थी १०, विधानसभा सदस्य २५०, विधान परिषद सदस्य ७५, विविध मंत्री ६० व इतर १० असे खोल्यांचे वाटप केले जाते. इमारत क्रमांक एकचा दुसरा मजला महिला आमदारांसाठी व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवला आहे. माजी आमदारांना आमदार निवासात राहायचे असेल तर आमदार निवास समितीचे अनुमती पत्र आणणे आवश्यक असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mla residence repair