परगावाहून मुंबईत शिकायला किंवा नोकरीला येण्याचे स्वप्न अनेक जण उराशी बाळगतात आणि ते साकारतातही. पण मुंबईत आल्यावर घर शोधण्यापासून त्यांची परवड सुरू होते. घर शोधण्यासाठी सर्वात प्रथम दलालाला गाठावे लागते. जेव्हा आपण विद्यार्थी असतो किंवा नोकरीच्या शोधात असतो त्यावेळेस दलालांना थोडे पैसे देणेही जड वाटते. पण त्याला पर्यायही नसतो. असाच अनुभव बेंगळुरूहून मुंबईत शिकण्यासाठी आलेल्या गौरव मंजुल यांना आला. त्याचवेळी त्यांनी अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी काही तरी पर्याय सुरू करण्याचे मनात ठरविले आणि त्यावर विचार करत असताना मोबाइल अ‍ॅपची संकल्पना समोर आली.

मंजुल यांनी २०१३मध्ये’http://flat.to/’ नावाचे संकेतस्थळ सुरू केले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून घर शोधणारे आणि घरसोबती शोधणाऱ्यांची गाठ घालून देण्याच्या कामास सुरुवात झाली. या संकेतस्थळाच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच एकटे राहणाऱ्यांना घर शोधणे, इतकेच नव्हे तर त्यांच्या आवडीनिवडीत बसणारा सोबती देण्याचे कामही केले जाते. ही सेवा पूर्णत: मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे घर शोधणाऱ्यांना किंवा घरसोबती शोधणाऱ्यांना एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. हे संकेतस्थळ वापरणे अधिक सोपे व्हावे व दोन व्यक्तींमधील संवाद सोपा व्हावा या उद्देशाने त्यांनी ‘फ्लॅटचॅट’ नावाचे अ‍ॅप सुरू केले असून, आता या अ‍ॅपच्या माध्यमातून दोन व्यक्ती आपापसात चर्चा करून घर मिळवू शकतात. संकेतस्थळावर किंवा अ‍ॅपवर नोंदणी करणाऱ्यांची सर्व माहिती कंपनीतर्फे नोंदविली जाते. तसेच त्याची शहानिशाही केली जाते. आपले घर किंवा घरसोबती शोधत असताना प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षांचा ताळमेळ घालून दोन व्यक्तींना ‘फ्लॅटचॅट’ या अ‍ॅपवर भेटवून देऊन त्यांचा संवाद सुरू करून देण्याचे काम कंपनीतर्फे केले जाते, असे कंपनीचे संस्थापक मंजुल सांगतात. कंपनी घर शोधणारा आणि घरसोबती शोधणारा यांच्यातील दुवा म्हणून काम करत असल्याचेही ते म्हणाले. या अ‍ॅपला नुकताच commonfloor.com या रिअल इस्टेट संकेतस्थळाने पाठिंबा दिला आहे. सध्या ही सुविधा मुंबई, पुणे, बेंगळुरू, कोटा, जयपूर, दिल्ली, चेन्नई, गुरगाव या शहरांसाठी उपलब्ध आहे.