न्यायालयात वकिलांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावले..एका पाठोपाठ एक प्रश्नांच्या फैरी झडत होत्या..कायद्याच्या कलमांचा किस पाडला जात होता. वादी-प्रतिवादींचे वकील करीत असलेला आवेशपूर्ण युक्तिवाद पाहून सारेच भारावून गेले होते..हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील अथवा न्यायालयातील नव्हता तर मुंबईतील विधि महाविद्यालयांच्या ‘मॉक ट्रायल’ स्पर्धेतील होता. अभिरूप न्यायालयातील खटल्याची ही संकल्पना अभिनव तर होतीच; परंतु लॉ कॉलेजमधील पहिल्या वर्षांतील या भावी वकिलांची कामगिरीही थक्क करणारी होती.दादर येथील ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या लॉ कॉलेजमध्ये नुकतीच ‘मॉक ट्रायल’ची आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा रंगली. एकूण ११ विधि महाविद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अशाप्रकारची स्पर्धा पहिल्यांदाच भरविण्यात आली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्य वैशाली गुरव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेला प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसादानिशी दाद दिली.
कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयात खटले कशा प्रकारे लढले जातात याचे प्रत्यक्षिक या स्पर्धेतून पाहावयास मिळाले. वकिली पेशात नितीमत्ता जपण्याला प्राधान्य देण्यावर प्राचार्य वैशाली गुरव यांचा भर आहे. त्या दृष्टिकोनातून आगामी काळात पीईएस लॉ कॉलेजच्या माध्यमातून काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत पाहुणे न्यायाधीश म्हणून अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांनी जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेत पीजीसीएल ठाणे लॉ कॉलेजचे विद्यार्थी विजेते ठरले तर एनएमआयएमएस लॉ कॉलेजला सवरेत्कृष्ट युक्तिवादाचे पारितोषिक मिळाले.