जिल्ह्य़ातील बहुतांश भाग पावसाने व्यापल्यानंतर गुरुवारी मात्र त्याने अचानक उघडीप घेतली. मागील चोवीस तासांत जिल्ह्य़ात ६८० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना सुखद धक्का बसला. गुरुवारी संततधार कायम राहील, असे वातावरण असताना या दिवशी दुपापर्यंत चक्क ऊन पडले.
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्य़ात दाखल झालेला पाऊस प्रारंभीचे तीन ते चार दिवस काही विशिष्ट तालुक्यांपुरताच मर्यादित राहिला. उर्वरित भागात पाऊस होत नसल्याने चिंतेचे मळभ दाटले होते. परंतु, पाचव्या दिवशी जिल्ह्य़ातील बहुतांश भाग पावसाने व्यापला. नांदगाव तालुक्याचा अपवाद वगळता सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. मागील चोवीस तासांत जिल्ह्य़ात एकूण ६८०.१ मिलीमीटर पाऊस झाला. त्यात सर्वाधिक प्रमाण सुरगाणा तालुक्यात (८९.२ मिलीमीटर) तर सर्वात कमी प्रमाण नांदगाव (४.७ मिलीमीटर) आहे. चांदवड, कळवण, देवळा, निफाड, सिन्नर व येवला हे तालुके पावसाच्या प्रतीक्षेत होते. या ठिकाणी पावसाने समाधानकारक हजेरी लावली. नाशिक (२९), इगतपुरी (४०), दिंडोरी (२८), पेठ (७३), त्र्यंबकेश्वर (३८), मालेगाव (६१), चांदवड (४८), कळवण (७२), बागलाण (६७), सुरगाणा (८९), देवळा (४३.३), निफाड (३०), सिन्नर (२८) व येवला तालुक्यात (२८) असा पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आतापर्यंत जिल्ह्य़ात एकूण ३५५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील हंगामाच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्याहून अधिकने कमी आहे. गतवेळी याच काळात ८०९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
संपूर्ण जिल्हा व्यापल्यानंतर गुरुवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. शहर व परिसरात दुपापर्यंत ऊन पडले होते. काही भागांत रिमझिम स्वरूपात सरी कोसळल्या असल्या तरी त्याचा जोर कमी झाल्याचे जाणवत होते. पावसाने पेरणीची कामे सुरू झाली असून शेतकरी वर्गाची शेतात लगबग सुरू आहे. तीन ते चार दिवसांतील पावसाने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरण व बंधाऱ्यांची पाणी पातळी उंचाविण्यास मदत झाली आहे. गंगापूर धरणाच्या जलसाठय़ात वाढ होण्याची शक्यता आहे. उर्वरित धरणांमध्ये अद्याप समाधानकारक जलसाठा होऊ शकलेला नाही. परिणामी, ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे संकट कायम आहे. नाशिक जिल्ह्य़ात सध्या १७१ गावे आणि ३७७ वाडय़ांमध्ये १६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक टँकर सिन्नर तालुक्यात (८४) आहे. या तालुक्यातील ५५ गावे व २४८ वाडय़ांना तीव्र टंचाई भेडसावत आहे. येवला तालुक्यात १२, नांदगाव १५, चांदवड व बागलाण अनुक्रमे १४ व १६ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.