मुंबईत सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे मिळावीत या व अन्य काही मागण्यांसाठी ‘घर हक्क आंदोलना’तर्फे ४ जून रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी शासनाने गृहनिर्माण धोरण जाहीर केले. मुंबईतील उपकरप्राप्त जुन्या चाळींचा विकास, सामूहिक प्रकल्प, धारावीचा योजनाबद्ध विकास, झोपडपट्टीवासियांसाठी ‘एसआरए’ योजना, २० हजार चौरस फूटाहून मोठे भूखंड विकसित करणात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी २० टक्के सदनिका राखीव ठेवणे आदींचा त्यात समावेश होता. मात्र त्याची ठोस अंमलबजावणी झाली नसल्याचे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे.
वार्षिक उत्पन्नाच्या चार ते पाच पट किंमतीत घरे मिळावीत, ‘म्हाडा’ आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या चाळी शासनाने विकासित करून त्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकातून सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे बांधावीत, मुंबईतील मोडकळीस आलेल्या चाळी, बंद कारखान्यांच्या पडीक जमिनीचा वापर सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी केला जावा, खासगी विकासकाद्वारे घर बांधणी प्रकल्पात २० टक्के घरे परवडणाऱ्या दरात देण्याच्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आदी मागण्याही या मोर्चात केल्या जाणार आहेत.
सकाळी ११.०० वाजता आझाद मैदानातून मोर्चास सुरुवात होणार असून मोर्चात कामगार नेते दत्ता इस्वलकर, ए. डी. गोलंदाज आणि अन्य नेते सहभागी होणार आहेत.