*       मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
*       नाशिकरोड येथे शिवसेनेची फेरी
*       आज ‘जेल भरो’
स्थानिक संस्था कराच्या विरोधात सात दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत बंद गुरूवारी व्यापाऱ्यांनी अधिक तीव्र करत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. तसेच रविवार कारंजा येथे सत्यनारायण पूजनही केले. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला आता शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या १०० ते १५० व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. नाशिकरोड येथे काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांसह इतर नेते सहभागी झाले होते. शासनावर दबाव वाढविण्यासाठी व्यापारी संघटनांनी आता गुरूवारऐवजी शुकंवारी ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या आंदोलनात सर्वसामान्य नागरिक नाहक भरडले जात असून दैनंदिन वस्तू खरेदी करणेही त्यांना जिकिरीचे झाले आहे.
अक्षय्य तृतीया व त्यापुढील एक दिवस काहीअंशी खुली राहिलेली दुकाने आंदोलन सत्रामुळे पूर्णपणे बंद झाली. बेमुदत बंदला प्रथम आक्षेप घेणाऱ्या काही व्यापारी संघटनांनीही आंदोलनात उडी घेतल्यामुळे गुरूवारी बंदचा प्रभाव अधिकच जाणवला. शासनाने स्थानिक संस्था कर कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार नसल्याचे बजावल्यानंतर व्यापारी संघटना अधिकच संतप्त झाल्या आहेत. सर्वसामान्यांना कोंडीत पकडून शासनावर दबाव वाढविण्यासाठी बेमुदत बंदला व्यापक स्वरूप देण्यासाठी व्यापारी कृती समिती प्रयत्नशील आहे. प्रमुख बाजारपेठेतील दुकाने कोणत्याही परिस्थितीत उघडणार नाहीत, यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी फिरून प्रयत्न केले. उघडी दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले. केवळ दुकानेच नव्हे तर, रस्तोरस्ती विविध वस्तुंची होणारी किरकोळ विक्री समितीने बंद केली.
परिणामी, बाजारपेठेत शुकशुकाट पसरल्याचे दिसत होते. इतर जिल्ह्यातील व्यापारी संघटनांच्या आवाहनानुसार स्थानिक व्यापाऱ्यांनी या दिवशी जेलभरो आंदोलनाचे आयोजन केले होते. तथापि, काही कारणास्तव हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले.
गुरूवारी सकाळी रविवार कारंजा येथील सिद्धीविनायक मंदिरात सत्यनारायण पूजा करून कर मागे घेण्याचे साकडे घालण्यात आले. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. नीलेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काही शिवसैनिकही आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती धान्य किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी दिली.
सत्यनारायण पूजन झाल्यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. कर लागू करण्यासाठी आग्रही असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याने त्यांनी व्यापाऱ्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. पोलिसांनी १०० ते १५० व्यापाऱ्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले.
मूक मोर्चा, मेणबत्ती फेरी या प्रकारच्या मार्गाचा अवलंब करण्यात येणार असल्याचे कृती समितीकडून सांगण्यात आले. यापूर्वी आंदोलनात सहभागी न झालेले घाऊक कापड व्यापारी, शैक्षणिक साहित्य विक्रेते, हार्डवेअर व पेंट्स, इलेक्ट्रीकल साहित्य विक्रेते सहभागी झाल्यामुळे ग्राहकांची अवस्था बिकट झाली आहे.