निवृत्तीनंतरचे आयुष्य समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा निश्चय करून विविध संस्था तसेच गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना मदत मिळवून देण्याचा वसा घेतलेले टीजेएसबी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कर्वे यांनी गेल्या शैक्षणिक वर्षांत १०३ गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना विविध दात्यांकरवी तब्बल ५० लाखांहून अधिक मदत मिळवून दिली आहे. तसेच यासह गेल्या चार वर्षांत विविध शैक्षणिक आणि आरोग्य केंद्रांना या चळवळीने सव्वातीन कोटी रुपयांची मदत मिळवून दिली आहे.
‘विश्वास उत्पन्न करणारी कृतिशील समाजसेवा’ असे वर्णन केल्या जाणाऱ्या या चळवळीतील उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले दाते, संवेदनशील नागरिक आणि गुणवंत विद्यार्थी पालकांचे एक हृद्य संमेलन मंगळवारी टीप-टॉप प्लाझा सभागृहात पार पडले. केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ. संजय ओक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्यास उपस्थित होते. ‘मी-माझे-मला’ या व्यक्तिकेंद्री जीवनापलीकडे जात समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्यासाठी अनेकजण आता स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे चित्र या संमेलनाच्या निमित्ताने दिसले.
नाना पालकर स्मृती रुग्णालय, ठाणे-रायगडमधील ग्रामीण भागातील विविध शाळांना मदत मिळवून देण्यात डॉ. कर्वे यांच्या या उपक्रमाचा खूप उपयोग होत आहे. समाजातील विविध संवेदनशील नागरिक दाते म्हणून या उपक्रमात सहभागी होत आहेत. मुख्यत: शिक्षण आणि आरोग्य या दोन घटकांना मदत मिळवून देणे या चळवळीचे उद्दिष्ट आहे.
आरोग्य तसेच शिक्षण विभागातील उणिवा भरून काढणारी ही कर्वेप्रणीत चळवळ स्तुत्य असून समाजातील संवेदनशील व्यक्ती ती अधिक सशक्त करतील, असा विश्वास डॉ. संजय ओक यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. गरजूंना मदत करण्याची भावना वाढीस लागणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केअर अ‍ॅण्ड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असे या उपक्रमाचे वर्णन केले.
पैसे ओळखीतून नव्हे, तर व्यवस्थेतून मिळतात. दिल्याने कधीच कमी होत नाही. शिक्षणासाठी मदत मिळालेले हे विद्यार्थी भविष्यात समाजाला भरभरून देऊन ऋण फेडतील, असा विश्वास अखेरच्या सत्रातील प्रकट मुलाखतीदरम्यान रवींद्र कर्वे यांनी व्यक्त केला. पाहुण्यांचा परिचय, आभार प्रदर्शन आदी औपचारिक प्रथा टाळून अतिशय आटोपशीर आणि नेटकेपणाने या संमेलनाची सांगता झाली.