शहरात साकारणाऱ्या गृह प्रकल्पांत दूरध्वनी व ब्रॉडबँडची समूह स्वरूपात नोंदणी करण्याची नवीन संकल्पना मांडणाऱ्या भारत दूरसंचार निगमच्या (बीएसएनएल) तब्बल १८ हजार ९६३ ग्राहकांनी अवघ्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणांनी सोठचिठ्ठी दिल्याची बाब पुढे आली आहे. २०१२-१३ या वर्षांत देयके न भरल्याने १०,६२२ ग्राहकांनी तर ‘बीएसएनएल’च्या सेवेला त्रस्त होऊन ८,३४१ जणांनी स्वत:हून आपले दूरध्वनी बंद केले. या परिस्थितीत बीएसएनएल नाशिकला १६.५० कोटींचा नफा झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २८२ ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा उपलब्ध असून चालू वर्षांत ११०२ ग्रामपंचायतींना ही जोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे.
या बाबतची माहिती दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत महाव्यवस्थापक सुरेश बाबू प्रजापती यांनी दिली. याप्रसंगी खा. समीर भुजबळ, खा. प्रतापदादा सोनवणे, खा. हरिश्चंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी खा. भुजबळ यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे प्रजापती यांनी दिली. खासगी कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी काही वर्षांपूर्वी बीएसएनएलने बिनतारी दूरध्वनीची सेवा उपलब्ध केली होती. जिल्ह्यात आतापर्यंत ६,४०४ बिनतारी दूरध्वनीच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. परंतु, या सेवेत ग्रामीण भागात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे प्रजापती यांनी मान्य केले. भारनियमनामुळे ग्रामीण भागात त्या दूरध्वनीची बॅटरी चार्ज होत नाही. परिणामी, काही दिवसात ती निकामी होते, असेही त्यांनी नमूद केले. खासदार महोदयांनी काही प्रश्न विचारताना आपल्या लोकसभा मतदारसंघाचाच विचार केल्याचे लक्षात येते. नाशिक, सिन्नर, ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात इंटरनेट सेवा आहे काय, थ्रीजी सुविधा किती ठिकाणी सुरू आहे, हे त्यांचे प्रश्न त्याच धाटणीचे म्हणता येतील. त्यावर बीएसएनएलने उपरोक्त तालुक्यांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच नाशिक, पिंपळगाव ओझर, मनमाड, चांदवड, मालेगाव, सिन्नर, ईगतपुरी, देवळाली, त्र्यंबकेश्वर व भगुर या ठिकाणी थ्रीजी सुविधा सुरू आहे. जिल्ह्यात कोणतेही दूरध्वनी केंद्र बंद नाही.
बीएसएनएलच्या भ्रमणध्वनी सेवेबद्दल ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. अनेक भागात रेंज मिळत नसल्याने भ्रमणध्वनी बंद पडतो. वारंवार भ्रमणध्वनी लावल्यानंतरही तो लागत नाही. त्यास वैतागून अनेक ग्राहकांनी या सेवेला सोडचिठ्ठी देणे पसंत केले आहे. या पाश्र्वभूमीवर, या सेवेतील अडचणींविषयी बीएसएनएलने मौन बाळगले. नाशिक लोकसभा मतदारसंघातील पांगरी ते दातली या भागात बीएसएनएलच्या भ्रमणध्वनीला रेंज नाही. या परिसरात इतर कंपन्यांच्या भ्रमणध्वनीला रेंज असल्याचे बीएसएनएलने म्हटले आहे. महामार्गावरील सेवेत असाच गोंधळ असला तरी नाशिक-पुणे, सिन्नर-शिर्डी, नाशिक-सापुतारा, नाशिक-सटाणा, मालेगाव, येवला-वैजापूर या महामार्गावर पुरेसे भ्रमणध्वनी मनोरे असून यामुळे सेवेत कोणतेही अडचण नसल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले आहे. शहरात गोविंदनगर परिसरात दूरध्वनी सेवेची मागणी असून त्या ठिकाणी दूरध्वनी केबल टाकण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
नवीन उपक्रम
बीएसएनएलच्या नफ्यात वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या योजना मांडण्यात आल्या आहेत. शहरात साकारणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना समूह स्वरूपात दूरध्वनी व ब्रॉडबँडची जोडणी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला १४८ ठिकाणी ‘लीज्ड लाईन’, नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेसाठी त्या परिसरात लिज्ड लाईनच्या केबलचे नुतनीकरण, सहकारी बँकांसाठी ‘कोअर बँकिंग’ची खास व्यवस्था, औद्योगिक क्षेत्रासाठी विना भाडेतत्वावर आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा, अभियांत्रिकी महाविद्यालयांना इंटरनेटची खास जोडणी आदींचा समावेश असल्याचे महाव्यवस्थापक प्रजापती यांनी सांगितले.