आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलादालन, अत्यंत दिमाखदार सजावट, ठिकठिकाणी सौंदर्यदृष्टीने उभारलेले कृत्रीम झरे, झाडे यांनी सजलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-२ने हळूहळू आपला ‘देशी’पणा दाखवायला सुरुवात केली आहे. बॅगेज हाताळण्यात कर्मचाऱ्यांना होणारा त्रास, इमिग्रेशनसाठी भरपूर काउंटर्स असूनही अपुरे कर्मचारी, पार्किंगसाठी अव्वाच्या सव्वा दर अशा अनेक समस्या आता समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच आता या नव्या टर्मिनलवर डासांची गुणगूण ऐकू येऊ लागली आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या नव्या टर्मिनल-२ वर बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठी आलिशान प्रतीक्षा दालने उभारली आहेत. या दालनांची सजावट अत्यंत कलात्मक पद्धतीने केली आहे. मात्र या दालनांमध्ये डोकावल्यास प्रवासी टाळ्या वाजवताना दिसले, तर ती या कलात्मकतेला दिलेली दाद नसून आसपास घोंघावणारे डास टिपण्यासाठी चाललेली खटपट असते. या बिझनेस क्लाससाठीच्या प्रतीक्षा दालनात खुच्र्याखाली, टेबलांखाली, कुंडय़ांमागे डास असल्याने प्रवासी हैराण झाले आहे.
या टर्मिनलवर ठिकठिकाणी मोकळी जागा आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम झरे, झाडे यांचाही समावेश सजावटीत केला आहे. त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव चटकन होतो. आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी किंवा येथून उड्डाण करणारी बहुतांश विमाने रात्रीपासून सकाळी सात या कालावधीत येतात. डास सक्रीय असण्याची वेळही हीच असते. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर वेगळ्या अर्थाने ‘रक्त आटवावे’ लागत आहे. विशेष म्हणजे मुंबई विमानतळ प्राधिकरणाने आपल्या फेसबूक आणि ट्विटरच्या पेजवरून या ‘डासोच्छादा’बद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे.
डास आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचे नाते खूपच जुने आहे. मात्र या नव्या आणि आलिशान टर्मिनलमध्येही डास आपली पाठ सोडणार नाहीत, ही अपेक्षा प्रवाशांनी केली नव्हती. आता डासांपासून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी विमानतळ प्राधिकरण नालेसफाई आणि औषध फवारणीवर भर देत आहे.