एकीकडे साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी घरात व घराबाहेर स्वच्छ पाण्याची साठवणूक जास्त दिवस नकरण्याच्या संदेशासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असताना कळंबोलीमधील सेक्टर ११ येथील सिडकोच्या उद्यानात डासांची पैदास होत असल्याचा धक्कादायक प्रकार रहिवाशांनी उजेडात आणला आहे. येथील उद्यानामध्ये सिडकोचे लक्ष नसल्याने पावसाळा निघून गेला तरी पाण्याचे डबके कायम आहे. रहिवाशांनी उद्यानाच्या दुरवस्थेचे छायाचित्र महामुंबई वृत्तान्तकडे सुपूर्द करून सिडकोच्या ढिम्म कारभाराचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे सिडकोने उद्यानातील ही डासांची उत्पत्ती करणारी डबकी नष्ट करावीत अन्यथा ही डबकी लवकरच कोरडी करावीत, अशी मागणी येथील सोसायटय़ांमधील रहिवाशांनी केली आहे.
कळंबोली, सेक्टर ११ येथील उद्यान हे डासांचे उत्पत्तिस्थान बनले आहे. सेक्टर ११ येथील उद्यानालगत गुरुकुटीर, इव्ही होम, कार्तिक, गुरुविहार, ए-टाइप या सोसायटय़ांमध्ये सुमारे पाचशे कुटुंबे राहतात. या परिसरात पाच घरांमागे एक व्यक्ती असे ताप येणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण आहे. याबाबत गुरुविहार सोसायटीमधील रहिवासी राजेश पवार यांनी सिडकोशी पत्रव्यवहार केला आहे. या उद्यानामध्ये दोन ठिकाणी पाण्याची लहान तळी कारंज्यांसाठी करण्यात आली होती. मात्र कारंज्याचे फवारे उडू न शकल्याने या डबक्यांत साचलेल्या पावसाळी पाण्यामुळे ही डबकी डासांना अळी उत्पत्तीसाठीची ठिकाणे बनली आहेत. या डबक्यांत अनेक लहान मुले मासे पकडतात. चार महिन्यांपूर्वी या माशांना पाहण्यासाठी गेलेली लहानगी मुलगी याच डबक्यात पडली होती. या वेळी येथील रहिवाशांनी हे बिनकामाचे डबके  जमीनदोस्त करण्याची मागणी केली होती; परंतु उद्यानाची परिस्थिती जैसे थे राहिली आहे. हे डबके व उद्यानामधील खड्डय़ांमध्ये साचलेले पाणी मॉर्निग वॉक करणाऱ्यांना डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजारांची आठवण करून देतात. नागरिकांच्या हिताचे नाही असे बिनकामाचे पण धोकादायक डबके या उद्यानात कोणासाठी ठेवले आहे, असा प्रश्न या उद्यानामध्ये रोज मॉर्निग वॉक करणारे रहिवासी वैभव यादव यांच्यासह अनेकांना पडला आहे.
सेक्टर ११ येथील उद्यानामधील फाउंटनध्ये गप्पी मासे सोडले असून त्या डबक्यात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधक रसायन टाकले आहे. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती होत नाही. नागरिकांची या धोकादायक डबक्याविषयीची तक्रार असल्यास लवकरच संबंधित विभागाशी बोलू.
– नंदकिशोर परब,
आरोग्य विभाग अधिकारी, सिडको

सेक्टर ११ येथील उद्यानामध्ये असलेले फाउंटन हे डासांच्या उत्पत्तीसाठी नाही. याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्यास लवकरच आरोग्य विभागाशी संयुक्त चर्चा करून यावर निर्णय घेऊ.  येथे गप्पी मासेसाठी आरोग्य विभागे हे फाऊंटन ठेवल्यास आरोग्याच्या हिताचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल.  
– किरण फणसे,
अधीक्षक अभियंता, सिडको