स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याच्या मुद्यावरून शासनाशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर व्यापारी संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करण्याचे सुतोवाच केले असले तरी त्यास काही संघटनांनी विरोध दर्शवत दुकाने खुली करण्याचा पवित्रा स्वीकारल्याने आंदोलक व्यापाऱ्यांवर त्यांची आर्जव करण्याची वेळ आली आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून पुन्हा बेमुदत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी सरसावलेले व्यापारी संधीसाधू असल्याची टिकाही सर्वसामान्यांमधून होत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या व्यापारी संघटनांनी आता जनजागृतीबरोबर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी प्रमुख बाजारपेठेतील दुकाने बंद रहावीत, याकरिता संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना धडपड करावी लागली.
एलबीटी विरोधात व्यापारी संघटनांनी पुकारलेला बेमुदत बंदचा मंगळवार हा खरेतर सहावा दिवस. त्यात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी व्यापाऱ्यांनी बहुतेक दुकाने उघडून व्यापारी कृती समितीच्या निर्णयाला धाब्यावर बसविले. तरिही स्थानिक पातळीवरील काही व्यापारी संघटनांनी आपला हेका कायम ठेवल्याचे पहावयास मिळाले. तथापि, यापूर्वी व्यापारी संघटनांचे दिसलेले संघटन कमकुवत झाल्याचे अधोरेखीत झाले आहे. धान्य किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कराविरोधातील बंद पुढेही कायम सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी सत्यनारायण पूजन व तत्सम गांधीगिरी पद्धतीने आंदोलने केली जाणार असल्याचे संचेती यांनी स्पष्ट केले. या बैठकीत १५० ते २०० व्यापारी उपस्थित होते. बेमुदत बंद आंदोलनात प्रारंभी वेगवेगळ्या ३२ संघटना सहभागी झाल्या होत्या. तथापि, त्यातून आता सराफ बाजार असोसिएशन, हार्डवेअर व पेंट्स, शैक्षणिक साहित्य विक्रेते, कापड विक्रेते, इलेक्ट्रीकल साहित्य विक्रेते आदी व्यावसायिक एकतर बाहेर पडल्याचे दिसत आहे अथवा बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. यामुळे त्या संघटनांचे पदाधिकारी बैठकीतही सहभागी झाले नाहीत. मंगळवारी शहरातील प्रमुख बाजारपेठेसह निम्म्याहून अधिक दुकाने नेहमीप्रमाणे सुरू झाल्याचे दिसत होते.
या संदर्भात संचेती यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी गैरसमजातून ही दुकाने उघडली गेल्याचा दावा केला. बुधवारपासून सर्व व्यावसायिक आपापली दुकाने बंद ठेवतील, असेही ते म्हणाले. काही संघटना बेमुदत बंदला विरोध करत असल्याबाबत संचेती यांनी संबंधित संघटनाना आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुन्हा विनंती केली जाणार असल्याचे सांगितले.
सराफ बाजार असोसिएशनच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना स्थानिकांना तशा सूचना देण्याची विनंती करण्यात आली आहे. दुकाने बंद ठेवून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांनी जनजागृती करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोणताही कर लागू झाला तरी व्यापारी हा केवळ शासन व सर्वसामान्य नागरीक यांच्यातील एक दुवा आहे. यामुळे स्थानिक संस्था कर लागू झाल्यास नागरिकांवरही कसे संकट ओढावेल, याची माहिती कृती समिती आता देणार असल्याचे संचेती यांनी म्हटले आहे. ज्या व्यापारी संघटनांनी आपापली दुकाने सुरू ठेवली, त्यांनी स्थानिक संस्था कराला विरोध असल्याचे स्पष्ट केले. आम्ही व्यापारी कृती समितीसोबतच असलो तरी परिस्थिती पाहून काही निर्णय घ्यावे लागतात, असे सूचक विधानही त्यांच्यामार्फत केले जात आहे. सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी दुकाने बंद ठेवायची की नाही, याबद्दल बुधवारी बैठकीत निर्णय होणार असल्याचे सांगितले.