तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे प्रवरा नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणात होणारा अवैध वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी नागरिकांनी महसूल आणि पोलिसांकडे केली. परंतु या यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी वाळूतस्करांची मोटारसायकल पेटवून दिली. या अनपेक्षित प्रकारामुळे वाळूतस्कर अन्य वाहनांसह पळून गेले.
रविवारी रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकाराने काही काळ तणावही निर्माण झाला होता. कोल्हार येथील प्रवरा नदीपात्रातील वाळूचा लिलाव ग्रामस्थांनी अद्यापपर्यंत होऊ दिला नाही. त्यामुळे अवैध मार्गाने मोठय़ा प्रमाणात वाळूतस्करी सुरू आहे. ती थांबवावी अशी मागणी नागरिकांनी वारंवार महसूल खात्याकडे केली. परंतु महसूल खात्याने त्याची दखल घेतली नाही. रविवारी रात्री अकराच्या सुमारास प्रवरा नदीपात्रात थडीफाटय़ाजवळ चार-पाच मोठी वाहने उतरली. त्यांना पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पाठलाग केला, मात्र वाळूतस्करांना अगोदरच त्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते वाहने घेऊन फरार झाले. एकाची मोटारसायकल नदीपात्रात राहिल्याने संतप्त जमावाने ती पेटवून दिली. अध्र्या तासानंतर लोणी पोलीस घटनास्थळी आले. परंतु ही आमची हद्द नाही असे सांगत त्यांनी यातून अंग काढून घेतले.
लोणी व राहुरी पोलीस ठाण्यात विचारणा केली असता, कुणीही फिर्याद दिली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगण्यात आले. तहसील कार्यालयानेही या घटनेबाबत कानावर हात ठेवले. त्यामुळे या घटनेची कुठेही नोंद नाही.