सिडकोने कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेल्या वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृह या नवी मुंबईतील एकमेव सांस्कृतिक केंद्राची नवी मुंबई पालिकेने कशी वाताहत केली आहे, त्याचे एक उत्तम उदाहरण समोर आले असून नाटय़प्रयोगांच्या वेळी उंदीरमामा इकडेतिकडे सर्रास फिरत असल्याचे दिसून येतात तर दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या खुच्र्याची योग्य निगा न राखल्याने त्यात आता उवांचाही त्रास प्रक्षेकांना सहन करावा लागत आहे.
नवी मुंबईकरांसाठी एकमेव असणारे नाटय़गृह अलीकडेच दीड महिना बंद ठेवून त्याची डागडुजी करण्यात आली. गेल्या पावसात भर रंगमंचावर पावसाच्या धारा बरसल्याने पालिकेने पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती केली. त्यासाठी नाटय़गृहाचे छत उघडून पुन्हा त्याचे प्लास्टरिंग करण्यात आले. त्याचबरोबर नाटय़गृहाच्या खांबांना सिमेंट क्राँक्रीटीकरणाचा मुलामा देण्यात आला. दीड महिना केवळ स्थापत्य कामांसाठी बंद करण्यात आलेल्या या नाटय़गृहातील इतर कामेही करणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे नाटय़गृहाचे वाभाडे नाटय़रसिकासमोर निघण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या नव्याने सुरू झालेल्या नाटय़प्रयोगाच्या वेळेत विद्युत यंत्रणेचे नियंत्रण करणाऱ्या रंगमचासमोरील कक्षात उंदीरमामा आरामात ये-जा करीत होते.  नाटकाच्या प्रयोगाबरोबरच उंदीरमामांचे प्रयोग पाहण्याची वेळ प्रेक्षकांवर आली होती. हे कमी म्हणून काय नाटय़गृहातील सुमारे २५ खुच्र्याचे हातच निकामी झाले असून त्यातील खिळे, लाकडाचे टोक प्रेक्षकांचे स्वागत करीत आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी ८० लाख रुपये खर्च करून नव्याने बसविण्यात आलेल्या खुच्र्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे खुच्र्यावर लावण्यात आलेले कपडयाचे कुशन निकृष्ट दर्जाचे असल्याचे एव्हाना स्पष्ट दिसून येत असून त्यातून उवा  घेऊन प्रेक्षकांना घरी जावे लागत आहे. अनेक दिवस या नाटय़गृहात पेस्टकंट्रोल  करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे नाटय़गृह सध्या उंदीर आणि उवांचे गृह झाले असल्याचे दिसून येते. पेस्टकंट्रोल करण्यासाठी दोन दिवस नाटय़गृह बंद ठेवावे लागत असल्याने ही फवारणी लांबणीवर पडल्याचे नाटय़गृह व्यवस्थापनाने सांगितले. सलग दोन दिवस नाटय़प्रयोगातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर ही फवारणी तात्काळ करून घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत प्रेक्षकांनी नाटकांचा आस्वाद उंदीर व उवांबरोबर घ्यावा लागणार आहे.