किसनराव वराळ पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर (निघोज, ता. पारनेर) चौकशी अधिकारी म्हणून सहायक निबंधक ए. व्ही. भांगरे यांची जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी नियुक्ती केली. लेखा परीक्षणात संस्थेत निदर्शनास आलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची जबाबदारी निश्चित करून भांगरे ६ महिन्यांच्या आत हौसारे यांना अहवाल द्यायचा आहे.
लेखा परीक्षक एन. ए. कर्डिले यांनी संस्थेचे लेखापरीक्षण केले. त्यात त्यांना संस्थेच्या कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात अनेक त्रुटी आढळल्या. सर्व बाबींचा सविस्तर विचार करून त्यांनी संस्थेला सुमारे ५ कोटी ६० लाख १ हजार १६ रुपयांचा तोटा झाल्याचे विविध मुद्दय़ांसहीत निश्चित केले व तसा अहवाल सादर केला.
या अहवालावरून संस्थेचे सभासद पोपट शिवराम शिंदे (रा. अळकूटी, ता. पारनेर) यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन हौसारे यांनी भांगरे यांची आता चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. व्याजात बेकायदा दिलेल्या सवलतीपोटी झालेला १ कोटी १४ लाख ८० हजार ८७ रूपयांचा तोटा, वाहन विक्री तसेच मालमत्ता खरेदी, कर्ज येणे आदी मुद्दय़ावर भांगरे यांनी चौकशी करायची असून या गैरव्यवहाराची जबाबदारी कोणावर आहे ते निश्चित करायचे आहे.