डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी महापालिकेने चार महिन्यापासून खणून ठेवले आहेत. या भागात सेवा वाहिन्या टाकण्याची कामही संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. येत्या सात दिवसात पालिकेने हे रस्ते नागरिकांसाठी खुले केले नाही तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते स्वत: पुढाकार घेऊन हे रस्ते वाहतुकीसाठी खुले करतील, असा इशारा मनसेने दिला आहे.
पाटकर रस्ता, राजाजी रस्ता, वाहतूक कार्यालयासमोरील रस्ते, शिवमंदिर रस्ता काँक्रिटीकरणाची कामे, महावितरण, बीएसएनएल, रिलायन्स यांच्या सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदून ठेवण्यात आले आहेत. पाटकर रस्त्यावर सकाळच्या वेळेत मजूर कामगारांची गर्दी असते. या भागात फेरीवाले बसलेले असतात. रस्ते खणून ठेवल्याने रिक्षांना या भागात येजा करता येत नाही. ठेकेदाराच्या मनमानीमुळे अतिशय संथगतीने ही कामे सुरू आहेत. या भागात उभ्या राहणाऱ्या रिक्षा बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, केळकर रस्त्यावर आडव्या उभ्या केल्या जातात.  केळकर रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला आहे. या रस्त्यावर सकाळ ते रात्री उशीरापर्यंत वाहतूक कोंडी असते. वाहतूक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा रस्ता असूनही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक  विभागाकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. मानपाडा, पाथर्ली-घरडा सर्कल हे रस्तेही लवकरच महापालिकेने खुले करावेत. अन्यथा हे रस्ते सुरू करण्यास मनसे पुढाकार घेईल,  असा इशारा मनसेच्या शहर विभागाने दिला आहे.