नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाचे लक्ष लागलेले भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर असून, हवामानात अनपेक्षित बदल न झाल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात कोणत्याही क्षणी भंडारदरा धरण भरून वाहू लागेल. भंडारदरा भरल्यावर तीन-चार दिवसांतच निळवंडेही ओव्हरफ्लो होईल. मुळा धरण भरण्यासाठी मात्र अजून काही दिवसांचा अवधी असला तरी ते धरणही या वर्षी ऑगस्ट महिन्यातच भरण्याची दाट शक्यता आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या अनेक दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. पडणाऱ्या पावसाची तीव्रता आणि त्यातील सातत्य यावर धरण केव्हा भरणार हे अवलंबून आहे. या वर्षी धुवाधार म्हणता येईल असा पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला नसला तरी पावसात खंडही पडलेला नाही. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठय़ांमध्ये नियमितपणे वाढ सुरू आहे. आज सायंकाळी धरणातील पाणीसाठा ९ हजार ८०० दलघफू (८९ टक्के) झाला होता. हे धरण २१५ फुटांच्या पातळीला गेले की ओसांडून वाहते, सध्या धरणाची पातळी २१० फूट आहे.
जलसंपदा विभागाच्या नियमांप्रमाणे ३१ जुलैपर्यंत धरणातील पाणीसाठा ९१ टक्क्यांपेक्षा अधिक झाला की पाणी सोडावे लागते. त्यानुसार १० हजार १०३ दलघफूपेक्षा जास्त झाला असता तर भंडारदरा धरणातून लगेचच पाणी सोडावे लागले असते. ऑगस्ट महिन्यात मात्र भंडारदरा धरणात ९५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा केला जातो. त्यामुळे १० हजार ५०० दलघफूपेक्षा पाणीसाठा वाढताच धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यास सुरुवात होईल. मागील काही दिवसांप्रमाणे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारीही मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. रतनवाडी येथे १६० मिमी तर घाटघरला १५ मिमी पावसाची नोंद झाली.
निळवंडे धरणात या वर्षी ६३६.१० मीटर तलांवापर्यंत म्हणजे ५ हजार २१० दलघफू पाणीसाठा करण्यात येणार आहे. आज सायंकाळी धरणातील पाणीसाठा ३ हजार ६०५ दलघफू होता. निळवंडे भरण्यासाठी आता फक्त १ हजार ६०० दलघफू पाण्याची आवश्यकता आहे. भंडारदऱ्याचा ओव्हरफ्लो सुरू होताच निळवंडे धरणही दोन ते तीन दिवसांत तुडूंब भरून वाहू लागेल. तालुक्याच्या उत्तर भागातही आढळेच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने आढळा धरणाचा पाणीसाठा ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आज सकाळी आढळा धरणात ३१३ दलघफू पाणी होता. हरिश्चंद्रगड अजा पर्वताच्या डोंगररांगात पडत असलेल्या पावसामुळे मुळा नदी आठवडाभरापासून दुथडी भरून वाहत आहे. मुळा धरण ६६ टक्केभरले असून सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा २०८ दलघफू होता. २६ हजार दलघफू क्षमतेचे मुळा धरण या वर्षी भरणार अशी चिन्हे दिसत असताना १५ ते ३० ऑगस्टच्या दरम्यान ते ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे तालुक्याचा बहुतांश भाग चांगलाच गारठून गेला आहे.