मरिन ड्राइव्हच्या सौंदर्यीकरणासाठी रस्ता दुभाजकावर लावलेल्या पेटुनियाच्या हजारो रोपटय़ांनी माना टाकल्यावर आता त्यांच्या जागी पालिकेने झेंडू आणि सदाफुलीची रोपे लावण्यास सुरुवात केली आहे. दोन ते तीन महिन्यातच विदेशी रोपटय़ांच्या प्रयोगानंतर थेट देशी फुलांची आठवण पालिकेला झाली असली तरी झेंडूच्या रोपटय़ांचे आयुष्यही पेटुनियाप्रमाणेच दोन ते तीन महिन्यांचे असते. दुभाजकांवरील रोपटय़ांचे प्रयोग करणारी पालिका करदात्या मुंबईकरांचे लाखो रुपये उधळत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. दुभाजकांचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी मरिन ड्राइव्हच्या सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पातच रोप लावण्याचे काम अंतर्भूत आहे. दर किलोमीटरमागे साधारणत पेटुनियाचे रोप लावण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे. 'रोप लावण्याचा खर्च प्रकल्पातच अंतर्भूत आहे. त्यामुळे रोप सुकली तरी कंत्राटदाराला त्याच खर्चात ती पुन्हा लावावी लागतील. आधीची रोपे सुकल्यामुळे त्या जागी पुन्हा नवीन रोप लावण्याच्या सूचना दिल्या', असे अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितले. मात्र अतिरिक्त आयुक्तांच्या सूचनेनंतर कंत्राटदाराने पेटुनियाच्या सुकलेल्या काडय़ा काढून तिथे झेंडू आणि सदाफुलीची रोपे लावण्यास सुरुवात केली. साधारणपणे शहरातील दुभाजकांवर रोपटी लावताना वर्षभर हिरवळ कायम राहील, फुले येतील तसेच ही रोपटी वाहनांमधून बाहेर पडणारा कार्बनचा धूर व कडक उन्हात तग धरतील हे निकष लावले जातात. पेटुनियाप्रमाणेच झेंडू व सदाफुलीही या निकषांवर उतरणारी नाही. दिवस-रात्र वर्दळ असलेल्या मरिन ड्राइव्हच्या रस्त्यावर कार्बन, उष्ण तापमान व समुद्राची खारी हवा यांना तोंड देणारे रोप आवश्यक असताना पालिका करत असलेल्या या नसत्या प्रयोगाबाबत बागकामतज्ज्ञांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेकडून योग्य पद्धतीने पाणी दिले जात नाही, खुरपणी होत नाही. अशा परिस्थितीत तग धरणारी रोपे निवडण्याऐवजी अत्यंत नाजूक, दोन ते तीन महिने टिकणारी रोपे लावण्याचा प्रयोग पालिका का करत आहे हे समजण्यापलीकडचे आहे, असे मत उद्यानविद्या क्षेत्रातील तज्ज्ञ सुहास जोशी यांनी व्यक्त केले. दुभाजकांवर लावण्यासाठी रोपांमध्ये कार्बन व उष्णता सहन करण्याची क्षमता असावी लागते. त्याचे प्रयोग बागकामतज्ज्ञ करतात. दर तीन महिन्यांनी रोपांचे वेगवेगळे प्रयोग करणे हा मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय आहे, असे त्यांनी सांगितले.खर्चपेटुनियाचे एक रोप - १२ रुपयेझेंडू किंवा सदाफुली - सहा ते आठ रुपयेदुभाजकांवर लावली जाणारी रोपे - बोगनवेल, निरियम, पेनडॉस, पेटलॅण्थस, इरॅन्थेमम, माल्पेजिया, क्लेरिडेन्ड्रॉन, लॅसोनिआ अल्बा, थेवेशिया, फिकस रेजिनाल्ड समुद्राच्या बाजूने जात असलेल्या रस्त्याच्या दुभाजकावर लावली जाणारी रोपे - पिसोनिया अल्बा, स्पायडर लिली, वाडेलिया, ड्वार्फ निरियमदुभाजकांवर झाडे लावताना पडताळले जाणारे निकष * झाडे वर्षभर हिरवीगार दिसणारी. * किमान दोन ते तीन वर्षे टिकणारी. * वाहनांमधून सोडला जाणारा कार्बन तसेच प्रचंड उष्णता सहन करणारी.