दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत मुंबईने अत्यंत निराशाजनक कामगिरी नोंदविली आहे. त्यामुळे, या फेरपरीक्षांचा मुंबईला तरी फारसा फायदा झाला नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.राज्यभरातून या परीक्षेकरिता नोंदविण्यात आलेल्या १,३९,३२९ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ३२,५१८ विद्यार्थ्यांनी मुंबई शहर-उपनगर, ठाणे, रायगड या मुंबई म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या विभागातून परीक्षा दिली होती. म्हणजे राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे एक चतुर्थाश म्हणजे २३ टक्के विद्यार्थी हे एकटय़ा मुंबईतील होते. मात्र, यापैकी केवळ १७.८४ टक्के म्हणजे ५,८०० विद्यार्थी या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले आहेत. ही कामगिरी गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच निराशाजनक आहे. कारण, गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेत मुंबईचा निकाल २५.८८ टक्के इतका लागला होता. त्याखालोखाल कोकण (१२.५३ टक्के) विभागाचा निकाल आहे. परंतु, कोकणातून अवघ्या १३४९ इतक्या विद्यार्थ्यांनी दहावीची फेरपरीक्षा यंदा दिली होती. तसेच, कोकणाचा मुख्य परीक्षेचा निकाल हा इतर विभागांच्या तुलनेत जास्त होता. त्यामुळे, फेरपरीक्षेचा निकाल कमी लागला तरी विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करता कोकणाची कामगिरी तितकीशी निराशाजनक ठरत नाही. परंतु, मुंबईत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ही राज्यात सर्वाधिक आहे. शिवाय गुणात्मकदृष्टय़ाही मुंबई इतर विभागांच्या तुलनेत खूपच मागे आहे.मुंबईतून उत्तीर्ण झालेल्यांपैकीही अवघ्या दोन विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य ही श्रेणी मिळाली आहे. पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होणारेही अवघे १२ विद्यार्थी आहेत. तर दुसऱ्या श्रेणीत अवघे २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित बहुतांश विद्यार्थी जेमतेम उत्तीर्ण होऊ शकले आहेत. आतापर्यंत मार्चच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेतली जात असे. परंतु, या वर्षी दहावीचा निकाल घोषित केल्यानंतर महिन्याभरात परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता पुरेसा वेळ मिळाला नाही, असे कारण मुंबईच्या निराशाजनक कामगिरीबाबत देताना मुंबई विभागाचे अध्यक्ष सिद्धेश्वर चांदेकर यांनी दिले.